Take a fresh look at your lifestyle.

कोरोना नंतर महाराष्ट्रात ‘या’ खतरनाक विषाणूचा सापडला पहिला रुग्ण, जाणून घ्या कुठे सापडला रुग्ण?

मागील दीड वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना महामारीत लाखो लोकांना आपल जीव गमवावा लागला आणि करोडो लोकांचा रोजगार गेला. आता कुठे कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आणखी एका खतरनाक विषाणूने डोके वर काढले आहे.

केरळपाठोपाठ आता महाराष्ट्रातही झिका विषाणूची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले असून, संक्रमित रुग्ण पुणे जिल्ह्यातील एका गावात सापडला आहे. संसर्ग झालेली महिला रुग्ण आता पूर्णपणे बरी झाली असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. यासोबतच अधिकाऱ्यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. संसर्ग झालेल्या महिलेच्या कुटुंबियात झिका विषाणूची कोणतीही लक्षणे नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

झिका विषाणूचा संसर्ग झालेली महिला पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील रहिवाशी असल्याचे प्रशासनाने माहिती दिली. महिलेचे वय 50 वर्ष असून तिला झिका संसर्गा सोबतच चिकनगुनिया हा आजारही झाल्याचे तपासणी अहवालात आढळले. प्रशासनाने संबंधित महिलेच्या गावचा दौरा करून या आजाराला रोखण्यासाठी काय पाऊले उचलायची आहेत, याबाबत सरपंच आणि उपसरपंचाशी चर्चा केली. त्यांना हा रोग  रोखण्यासाठी लागणारी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने बेलसर गावाला भेट देऊन तपासणी केली. राज्य निगराणी अधिकारी डॉ प्रदीप आवटे म्हणाले, “बेलसर गावातील झिकाचा संसर्ग झालेला  रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. स्टेट रॅपिड रिस्पॉन्स टीमने गावात पाहणी केली आणि स्थानिक अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली.”

केरळमध्ये आतापर्यंत 63 प्रकरणे

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, शनिवारी केरळमध्ये एका अल्पवयीन मुलीसह आणखी दोन व्यक्तींना झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्याने राज्यातील संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 63 झाली आहे.

Comments are closed.