Take a fresh look at your lifestyle.

येलदरी, निम्न दुधना प्रकल्प 100 टक्के भरले; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी 761.3 मिमी आहे. परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1085.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी जिल्ह्यात दि. 28 सप्टेंबर पर्यंत 827.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या जिल्ह्यातील जलप्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील येलदरी धरण आणि निम्न दुधना प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. दरम्यान मंगळवारी येलदारी धरणाच्या दहा गेट मधून 32 हजार 238 क्यूसेगने पूर्णा नदी पात्रात आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या 14 गेट मधून 30 हजार 324 क्यूसेने दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर गोदावरी नदीवरील ढलेगाव बंधाऱ्याच्या सर्व गेट मधून 2 लाख 9 हजार 277 क्यूसेगने, तारुगव्हान बंधाऱ्याच्या 17 गेट मधून 2 लाख 7 हजार 146 क्यूसेगने आणि मुद्द्गल बंधाऱ्याच्या 15 गेट मधून 2 लाख 41 हजार 259 क्यूसेगने गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

एकूणच पूर्णा, दुधना आणि गोदावरी या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सततचा पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आता मूग, उडीद या पिकांपाठोपाठ खरिपातील सोयाबीन, कापूस आदी पिकांचे ही सततच्या पावसाने नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास जातो की काय?अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरम्यान परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी सद्याची परिस्थती पाहता 28 आणि 29 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनास निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे आणि स्वतः बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Comments are closed.