Take a fresh look at your lifestyle.

महिला खासदारांसोबत झालेल्या ‘या’ धक्कादायक घटनेस राहुल गांधी यांनी म्हटले ‘लोकशाहीची हत्या’, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण’

नवी दिल्ली:  कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी राज्यसभेत काही महिला खासदारांशी कथित हाणामारीच्या घटनेला “लोकशाहीची हत्या” असे म्हटले आहे. त्यांनी महिला खासदारांना मारहाण, पेगासस हेरगिरी प्रकरण आणि केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सरकारचा निषेध केला.

“राज्यसभेत महिला खासदारांना मारहाण करण्यात आली आणि संसदेच्या या अधिवेशनात देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दडपण्यात आला, त्यांचा अपमान करण्यात आला आणि विरोधकांना प्रश्न उपस्थित करण्याची संधी देण्यात आली नाही.’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मल्लिकार्जुन खडगे यांनी सरकारविरोधात काढली पदयात्रा

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी संसद भवनाच्या सभागृहात झालेल्या सभेनंतर संसद भवनातून विजय चौकपर्यंत पदयात्रा काढली. यावेळी अनेक नेत्यांनी बॅनर आणि फलक लावले होते. बॅनरवर ‘आम्ही शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी करतो’ लिहिले होते. विरोधी नेत्यांनी ‘हेरगिरी थांबवा’, ‘काळे कायदे परत घ्या’ आणि ‘लोकशाहीची हत्या थांबवा’ अशा घोषणाही दिल्या.

पंतप्रधान उद्योगपतींना देश विकत आहेत: राहुल गांधी

‘आम्ही पेगासस मुद्द्यावर चर्चेची मागणी केली, सरकारने नकार दिला. आम्ही शेतकरी, महागाईचा मुद्दा संसदेबाहेर मांडला कारण आम्ही तो आतून मांडू शकत नाही. तुम्ही लोकांसमोर (मीडिया) बोलत आहात कारण आम्हाला आत बोलण्याची परवानगी नाही. हे लोकशाहीच्या हत्येपेक्षा काही कमी नाही. ते (पंतप्रधान) देशाचा आत्मा दोन-तीन उद्योगपतींना विकत आहेत.’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

माझ्या 55 वर्षाच्या राजकारणात अशी घटना पाहिली नाही: शरद पवार 

सभागृहात निषेधाच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या काही महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या महिला सदस्यांसोबत  धक्का-बुक्की करत त्यांचा अपमान केला.असा आरोप मल्लिकार्जुन खडगे यांनी केला. मात्र, सरकारने हे आरोप “सत्याच्या पलीकडे” असल्याचे सांगून आरोप फेटाळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवनातही पत्रकारांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात अशी परिस्थिती पाहिली नव्हती जिथे महिला खासदारांवर सभागृहाच्या आत हल्ला झाला.

Comments are closed.