Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ तालीबानी नेता होऊ शकतो अफगाणिस्तानचा प्रमुख; आहे कट्टरपंथी, ऐकून धक्का बसेल

काबूल: तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबान काबूलमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतला. तत्पूर्वी, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी आपल्या कुटुंबासह देश सोडून ताजिकिस्तानला पलायन केले. अफगाणिस्तानमध्ये आता शरिया कायदा लागू होणार असे तालिबानने जाहीर केले आहे. दरम्यान, असे मानले जात आहे की मुल्ला अब्दुल गनी बरदार आता देशाचे प्रमुख असतील. तर या लेखात आपण मुल्ला बरदार कोण आहे? याविषयी माहिती घेऊया.

तालिबानच्या मुख्य संस्थापकांपैकी एक

मुल्ला अब्दुल गनी बरदार त्या चार लोकांपैकी एक आहे, ज्यांनी 1994 मध्ये तालिबानची स्थापना केली होती. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने जेव्हा 2001 मध्ये अफगाणिस्तानात कारवाया सुरू केल्या होत्या, तेव्हा मुल्ला बरदार यांच्या नेतृत्वाखाली तालिबानने बंडखोरी केल्याचे सांगण्यात येते. अमेरिकन सैन्याने त्याचा अफगाणिस्तानात शोध सुरु केला होता पण त्याने पाकिस्तानात पलायन केले होते.

2010 मध्ये अटक आणि 2013 मध्ये सुटका

अमेरिकेने मुल्ला बरदार याला फेब्रुवारी 2010 मध्ये पाकिस्तानच्या कराची शहरातून अटक केली. 2012 पर्यंत अफगाणिस्तान सरकार शांततेच्या चर्चेला चालना देण्यासाठी कैद्यांच्या सुटकेची मागणी करत असे. सुटके साठी प्रस्तावित कैद्यांच्या प्रत्येक्क यादीमध्ये मुल्ला बरदार याचे नाव असायचे. अखेर सप्टेंबर 2013 मध्ये त्याची सुटका झाली. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा कुठे होता कोणासही ठाऊक नव्हते.

मुल्ला उमर याचा खास माणूस

अफगाणिस्तानात तालिबानची स्थापना 90 च्या दशकात झाली. त्यावेळी तालिबानचा प्रमुख मुल्ला मोहम्मद उमर होता. मुल्ला बरदार हा त्याचा खास माणूस होता. तसेच तो मुल्ला उमरचा जवळचा नातेवाईकही होता. असे म्हटले जाते की बरदारची बहीण मुल्ला ओमरची पत्नी होती.

पूर्णपणे इस्लामिक दृष्टिकोन

तालिबानच्या राजवटीत मुल्ला बरदार त्याच्या कठोर वृत्तीसाठी अधिक प्रसिद्ध होता. लोकशाही, स्त्रिया, खुल्या विचारसरणीबद्दल त्याचा कट्टर इस्लामिक दृष्टिकोन होता. तेव्हा तो मुल्ला उमर नंतर तालिबानचा दुसरा मोठा नेता होता.

दुर्रानी कुळातील

इंटरपोलनुसार मुल्ला बरादारचा जन्म उरुझगान प्रांतातील देहरावूड जिल्ह्यातील विट्मक गावात 1968 मध्ये झाला. तो दुर्रानी कुळातील असल्याचे मानले जाते. माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई हे देखील दुर्रानी आहेत.

Comments are closed.