सेलू :- सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय ‘ओपीडी’ समोरील ओट्याजवळ डोक्यात सिमेंटचे गटू, विटा घालून विशाल रामदास सदाफळे (वय ५०) या वेटरचा खून करण्यात आला. मंगळवारी ( एक मार्च) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोन आरोपींना अवघ्या पाच तासांतच पोलिसांनी गजाआड केले. महेबूब बडेमियाँ सय्यद, वय १९ व रेहान खान शफीखान पठाण, वय २२ (दोघे रा.राजीव गांधी नगर, सेलू जि.परभणी) अशी गजाआड करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मृताच्या बहीणीच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज व खबऱ्यांमार्फत माहिती घेऊन गतीने तपास चक्रे फिरवून गुन्ह्याचा छडा लावला. सेलू (जि.परभणी) तालुक्यातील कुंडी शिवारातून पोलिसांनी मंगळवारी आरोपींना ताब्यात घेतले व सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत विशाल सदाफळे हा सरकारी दवाखान्यात झोपला असता, आरोपींनी त्याचा मोबाइल हिसकावून घेतला.
तेव्हा विशालने त्यांना हटकले व ओळखले. त्यानंतर विशाल व आरोपींमध्ये बाचाबाची, झटापट होऊन भांडणात रुपांतर झाले. आरोपींनी विशालला शिवीगाळ करून बाजूला पडलेल्या सिमेंटच्या गट्टू व विटांनी डोक्यात गंभीर मारहाण करून ठार केल्याची कबुली जबाबात दिली. पोलिस अधीक्षक जयंत मीना, सहायक पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनात तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मारोती चव्हाण, नागनाथ तुकडे, दिलावरखान पठाण, विलास सातपुते, अनिस कौसडीकर, किशोर चव्हाण, संजय घुगे, मिलिंद कांबळे, मधुकर ढवळे, शेख रफीक आदींनी तपासाची कारवाई केली.
डाॅ विलास मोरे, सेलू
Comments are closed.