सेलू :- खरेदी केलेल्या वस्तूंची गुणवत्ता, प्रमाण, सामर्थ्य, शुद्धता आणि किंमतीबद्दल ग्राहकांना माहिती देणे बंधनकारक असले तरी निवड किंवा निर्णय घेण्यापूर्वी ग्राहकाने उत्पादनाच्या किंवा सेवेविषयी सर्व माहिती मिळविण्याचा आग्रह धरला पाहिजे. अनुचित व्यापारात ग्राहक आडकल्यास त्याला हक्काचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डाॅ विलास मोरे यांनी सेलू येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त परभणी जिल्ह्यात ग्राहक जागरण पंधरवाडा या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. १५ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या मोहिमेचा समारोप ३१ डिसेंबर रोजी सेलू येथील नुतन महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डाॅ विलास मोरे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, प्राचार्य महेंद्र शिंदे, उपप्राचार्य उत्तम राठोड, डाॅ अरविंद बोराडे, वजन मापे विभागाचे निरीक्षक सचिन खेडेकर, जिल्हा संघटक धाराजी भुसारे, के.बी. शिंदे, अशोक कोपुलवार, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, मंजुषा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार दिनेश झांपले म्हणाले की, विविध स्तरावर माहिती प्रसार करून ग्राहकापर्यंत माहिती पोहोचविल्यास कायद्याचा उद्देश पूर्ण करता येईल. ग्राहकांनी जाहिरातींना बळी न पडता वस्तू आणि सेवेची चोखंदळपणे निवड करणे गरजेचे आहे. ग्राहकांना मत व्यक्त करण्याचा, निवड करण्याचा, तक्रार आणि निवारण करण्याचा तसेच ग्राहक हक्कांविषयी जाणून घेण्याचा अधिकार आहे. या बाबत माहिती दिल्यास ग्राहकाची होणारी फसवणूक टाळता येईल. म्हणून विविध माध्यमातून ग्राहकाला या हक्कांबाबत जागरुक करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र शिंदे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा. नागेश कान्हेकर तर प्रा. सुषमा सोमानी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. भाग्यश्री धामनगावकर, गंगाधर कान्हेकर, प्रा. देविदास टेकाळे यांच्यासह ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते, तहसील कार्यालयाचे कर्मचारी, नुतन महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले….
Comments are closed.