Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात पुन्हा लसीचा तुटवडा, आता ‘इतके’ दिवस लसीकरण बंद राहणार

पुणे: भारतात देशव्यापी कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लस हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याने जगातील सर्व देश लसीकरणावर भर देताना दिसत आहेत. भारतातही मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत लस उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे लसीची कमतरता वारंवार जाणवत आहे.

दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती येत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे 2 दिवस लसीकरण बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पुण्यातील लसीकरण बंद राहणार असून, शुक्रवारीही महापालिकेला सरकारकडून लसींचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरातील कोव्हीशिल्ड लसीचे सर्व केंद्र आज आणि उद्या बंद राहतील. तसेच जर या दोन दिवसात महापालिकेला सरकारकडून लसीचा पुरवठा झाला तरच सोमवारपासून लसीकरण सुरू होईल.

मागे काही दिवसांपूर्वीच भारतात लसीकरणाचा 50 कोटींचा टप्पा पार झाला आहे. मात्र, पुण्यात सातत्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. या आठवड्याच्या सुरूवातीचेही दोन दिवस लसीकरण मोहीम ठप्प होती. राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला कोव्हिशिल्ड लसीचे 18 हजार डोस देण्यात आल्यानंतर बुधवारी लसीकरण मोहीम सुरु झाली होती. हे डोस संपल्यानंतर आता लसीकरण पुन्हा ठप्प झाले आहे. महापालिकेची 200 केंद्र असल्याने प्रत्येक केंद्रावर 100 डोस द्यायचे असले तरी किमान 20 हजार डोसची आवश्‍यकता असते.

लसींचा तुटवडा असाच सुरू राहिला तर केंद्र सरकारने जाहीर केलेले लक्ष्य पूर्ण होईल याची शंकाच आहे. केंद्र सरकारने या वर्षाअखेरपर्यंत देशातील सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे.

Comments are closed.