Take a fresh look at your lifestyle.

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची काही केल्या साडेसाती संपेना..

खरीप पाठोपाठ रब्बीही हातून जाण्याच्या मार्गावर हरभरा, गहू पिकावर किडीचा अटॅक

डाॅ विलास मोरे : खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. कापसाच्या पिकावर बोंडआळी आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पर्हाटी उपटून घेतली व रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकाची लागवड केली. मात्र सतत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे हरभरा,गहू पिकावर मररोग, घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे. हरभरा, गहू पिक जळून नष्ट होत असल्याने सेलू तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात उदार-उसनवारीने पैसे आणून महागडे बियाणे खरेदी करून सोयाबीन, कपाशी, तूर या पिकाची लागवड केली. त्यानंतर मात्र तालुक्‍यात पावसाने थैमान घातल्याने सोयाबीन कपाशी तूर या पिकांची नासाडी झाली. लागवड केलेला खर्च निघेल की नाही अशी भीती शेतकऱ्यांना होती मात्र पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांना गतवर्षीपेक्षा यावर्षी बऱ्यापैकी सोयाबीनचे उत्पन्न हाती आले. त्यानंतर शेतकऱ्यांची कपाशीवर भिस्त होती. मात्र बोंडआळीने कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी मधून भरून निघेल या आशेने शेतकऱ्यांनी हरभरा, गहू या पिकाची लागवड केली. मात्र सुरुवातीलाच हरभरा, गहू पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे एक-एक झाड नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांना आगाऊची फवारणी करावी लागत असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

□ फवारणीचा खर्च वाढला….

प्रती हंगामात पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना फवारणी साठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. उत्पन्न वाढविण्याच्या नादात नुकसानच सहन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे

□ वातावरणाचा उत्पन्नावर परिणाम…

वातावरणातील अनियमितता व सतत ढगाळ वातावरणामुळे पिकावर अनिष्ट परिणाम होत आहे. सध्या ही पीके फुलोऱ्यात आहेत. ढगाळ वातावरणामुळे पिकावर आळ्या पडल्या आहेत. त्यातच धुके पडत असल्याने फुल गळती होत आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. यावर्षी तरी चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. मात्र रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे.

□ शासनाने नुकसान भरपाई द्यावी…

यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगोदर सोयाबीन व कापुस या मुख्य पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला. आता हरभरा, गहू या पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कृषी विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत….

Comments are closed.