Take a fresh look at your lifestyle.

सेलू रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा देण्याची मागणी..मराठवाडा प्रवासी संघाचे रेल्वे मंत्र्यांना साकडे

सेलू (डाॅ विलास मोरे) : सेलू  रेल्वे स्थानकाला “ब” दर्जा मंजुर करावा. प्रस्तावित परळी, सोनपेठ, पाथरी रेल्वे मार्ग तयार करताना सेलू रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा देण्यात यावा. पुढे हा रेल्वे मार्ग अकोला-खामगाव रेल्वे मार्गाला जोडण्यात यावा, सेलू स्थानकांची नवीन इमारत तिर्थक्षेत्रा प्रमाणे विकसित करावी अशा विविध मागण्यांचे साकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने निवेदनाद्वारे घालण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी ना. दानवे रविवारी सेलू-जिंतुर मतदारसंघात आले असताना आमदार मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयात मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या शिष्टमंडळाने ना. दानवे यांची भेट घेऊन रेल्वे स्टेशनच्या विकासा संदर्भात चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, शशिकांत देशपांडे, डॉ ऋतुराज साडेगावकर, प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, विलास पांडे, भाऊ माणकेश्वर, ईश्वर जैन, कैलास कदम, मोहन खापरखुंटीकर, अभिजित राजूरकर, सुधीर मंडलीक, लक्ष्मण बोराडे, खिस्ते, रामेश्वर काजळे, कपील फुलारी, कृष्णा काटे आदींची उपस्थिती होती.

या वेळी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपण मराठवाड्यातील प्रलंबीत रेल्वे विकास कामांचे प्रश्न सोडवताना सेलू स्थानकाच्या  विकासासाठी प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले.

Comments are closed.