Take a fresh look at your lifestyle.

परदेशात शिक्षणासाठी निवास आणि भोजनाच्या खर्चासह मिळत आहे शिष्यवृत्ती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी

राज्यातील आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवण्यात येतात. त्यापैकि एक योजना परदेशात शिक्षण घेऊ इच्छित आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनाही परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोनाच्या प्रकोपामुळे या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 6 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली.

जगभरातील अव्वल 300 विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी मिळेल शिष्यवृत्ती

सध्या जगभरातील अनेक विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या करियरच्या दृष्टीने अनेक संधी निर्माण व्हाव्या या हेतूने आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहे. विद्यार्थ्यांना ज्या विद्यापीठात प्रवेश मिळेल त्या विद्यापीठात लागणारा सर्व शिक्षण खर्च, निवास आणि भोजनासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी विभाग शिष्यवृत्ती देत आहे. मात्र, हे विद्यापीठ जागतिक रॅंकिंगमध्ये अव्वल 300 मध्ये असायला हवेत. या 300 विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

ट्यूशन फी थेट विद्यापीठाच्या खात्यावर जमा होणार

विद्यार्थ्याला ज्या विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यापीठाच्या खात्यात आदिवासी विकास विभाग थेट ट्यूशन फी जमा करणार आहे. तसेच निर्वाह भत्ता विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल. यात भोजन आणि निवास याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विमानप्रवास खर्च, व्हिजा फी, स्थानिक प्रवास भत्ता, विमा आणि संगणक अथवा लॅपटॉप यांचा खर्च विद्यार्थ्याने स्वत: करावयाचा आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याच्या पात्रतेचे निकष काय?

  • विद्यार्थ्याचे वय जास्तीत जास्त 35 असावे.
  • नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा 40 असेल.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख इतके असेल.
  • परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किंवा IELTS या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष विचार केला जाईल.
  • भूमिहीन आदिवासी कुटुंबातील , दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यास प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य असणार आहे.

अर्ज कसा करणार?

पात्र विद्यार्थ्यानी http://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमूना उपलब्ध करून घ्यावा. तो अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 6 सप्टेंबर पूर्वी जमा करावेत.

कशी असेल निवड प्रक्रिया?

सर्व प्राप्त अर्जांची योग्य तपासणी केली जाईल आणि पात्र अर्ज अपर आयुक्त यांच्यामार्फत आदिवासी विकास आयुक्तालयात सादर करण्यात येतील. त्यानंतर आयुक्तालयातील समिती विद्यार्थ्यांची निवड करेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सर्व आवश्यक शैक्षणिक प्रक्रिया आणि व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

Comments are closed.