Take a fresh look at your lifestyle.

शिर्डीत होणार जिल्हा पर्यटन माहिती केंद्र सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश !

नगर ः शिर्डी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या धार्मिक व इतर हौशी पर्यटकांना नगर जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळांची माहिती होण्यासाठी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा केल्याने, शिर्डीत पर्यटक माहिती केंद्र सुरू करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत.

देश-विदेशातील भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या भाविक व पर्यटकांना जिल्ह्यातील इतर तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक ठिकाणे माहिती झाल्यास त्यातून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थकारणावर होईल. या स्थळांची माहिती सहजतेने उपलब्ध होण्यासाठी शिर्डी या मध्यवर्ती ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी जिल्हा माहिती केंद्र सुरू करण्याकरिता तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. भंडारदरा, निळवंडे धरणे, रंधा, अंब्रेला, नेकलेस, सौताडा, कळमजाई धबधबे, रतनवाडी, कळसूबाई, सांदणदरी, हरिश्चंद्रगड, पेमगिरी किल्ला व महावटवृक्ष, नगर शहरातील भुईकोट, चांदबीबीचा महाल, रणगाडा संग्रहालय, नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, शनिशिंगणापूर, देवगड, सिद्धटेक, हिवरेबाजार, राळेगणसिद्धी अशी अनेक ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहेत.

या ठिकाणी पर्यटनाच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्यास, त्यातून रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळणार आहे. यादृष्टीने मंत्री ठाकरे यांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला, शिर्डी येथे पर्यटन माहिती केंद्र सुरू करून तेथे दोन व्यक्तींची कायमस्वरूपी नेमणूक करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिर्डी येथे पोलिस अधीक्षक मनोज पाटील व पोलिस प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीत हे माहिती केंद्र सुरू होणार आहे.

Comments are closed.