Take a fresh look at your lifestyle.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांना जामीन मंजूर ! उच्च न्यायालयाचा निकाल

सेलू (डाॅ विलास मोरे) : सिद्धनाथ बोरगाव रस्त्यावर सुरेश करवा वय ४० वर्षे यांच्या खून प्रकरणात आरोपीला सहकार्य करण्यासाठी २ कोटींची लाच मागितल्या प्रकरणी सध्या जेलमध्ये असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांना सोमवार २० सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील अँड त्रिपाठी यांनी दिली.

सेलू येथील मारोती नगर येथे राहणारे सुरेश करवा यांचा सिद्धनाथ बोरगाव रस्त्यावर खून करण्यात आला. हे प्रकरण समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे मयताची पत्नी व व्यापारी राहुल कासट यांच्या मोबाईल संभाषणाची क्लिप उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या हाती लागली होती. घडल्या प्रकरणात तडजोडीसाठी राजेंद्र पाल यांनी राहुल कासट यांच्याकडे २ कोटींची मागणी केली होती.

तडजोडीत दीड कोटीवर हे प्रकरण मिटवण्याचे ठरल्यावर १० लाख रुपयांची लाच स्वीकारतांना मुंबई येथील लाचलुचत पथकाने पोलीस नायक गणेश चव्हाण यास ताब्यात घेऊन उभयतांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी राहुल कासट सह इतर चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.

सध्या हे सर्व आरोपी जेलची हवा खात आहेत. दरम्यान पोलिस नायक गणेश चव्हाण यास यापूर्वीच पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले आहे. लाच प्रकरणानंतर जेल मध्ये असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी जामिनासाठी यापूर्वी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर राजेंद्र पाल यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती.

त्यांचा जामीन न्यायालयाने दोन वेळा लांबणीवर टाकला होता. परंतू सोमवारी २० सप्टेंबर रोजी त्यांना जामीन मिळाला असल्याची माहिती आरोपीचे वकील अँड. त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान या प्रकरणात इतर आरोपी अद्यापही जेलची हवा खात आहेत. तर पोलिस नायक गणेश चव्हाण यास पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी निलंबित केले आहे. जामीनानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यावर पुढे प्रशासकीय कारवाई काय होते याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे….

Comments are closed.