Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील तेरा बाजार समित्यासाठी संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर

नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही घोषणा मागील आठवड्यात झालेली होती. त्यानुसार आता राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचा संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या संभाव्य निवडणूक कार्यक्रमानुसार १७ जानेवारी २०२२ ला मतदान होण्याचा अंदाज आहे. यामुळे तालुका पातळीवर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नेते कामाला लागले असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

कोरोना विषाणूमुळे सहकार विभागातील विविध संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या आदेश राज्य सरकारने जारी केलेला आहे. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी संभाव्य निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील नगर वगळता जिल्ह्यातील राहुरी, नेवासे, शेवगाव, श्रीगोंदे, पाथर्डी, कर्जत, जामखेड, अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, पारनेर या सर्व बाजार समित्याच्या निवडणूका होत असून त्यासाठी संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सहकार चळवळ गतीमान करणाऱ्या नगर जिल्‍ह्यात बाजार समित्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते यांची प्रतिष्ठा पणाला लागते. त्यामुळे या निवडणूकीमुळे मंत्री बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, रोहित पवार, माजीमंत्री मधुकर पिचड, माजीमंत्री राम शिंदे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके, संचालक प्रशांत गायकवाड यांच्यासह आजी-माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
————————–
चौकट
या संभाव्य कार्यक्रम असा आहे
१० नोव्हेंबर : प्रारुप यादी प्रसिध्द करणे
१० ते २२ नोव्हेंबर : प्रारुप यादीवर हरकती व आक्षेप मागवणे
२२ नोव्हेंबर ते एक डिसेंबर : प्राप्त हरकती व आक्षेपावर निर्णय
सहा डिसेंबर : मतदार यादी अंतिम करणे
१६ डिसेंबर : निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करणे
१६ ते २२ डिसेंबर : नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती व नामनिर्देशन पत्र प्रसिध्दी
२३ डिसेंबर : नामनिर्देशन पत्र छाननी
२४ डिसेंबर : नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी
२४ डिसेंबर २०२१ ते सात जानेवारी २०२२ : अर्ज माघार
दहा जानेवारी : निवडणूक चिन्हांसह अंतीम उमेदवारी यादी प्रसिध्द करणे
१७ जानेवारी :  मतदान
१८ जानेवारी : मतमोजणी
———
कोट
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने हा संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात बदलही होऊ शकतो.
-दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक

Comments are closed.