Take a fresh look at your lifestyle.

परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस;सहा मंडळांत अतिवृष्टी,नद्यांना पूर आल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प

परभणी जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसानंतर रात्रभर संततधार सुरू होती. त्यानंतर मंगळवारी (दि.28) पहाटेपासूनच दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात मंगळवारी (दि.28) सकाळी 11वाजून 29 मिनिटा पर्यंतच्या 24 तासांत सरासरी 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यात जिल्ह्यातील कावलगाव (93.5 मिमी), चुडावा (81.5 मिमी), आवलगाव (71.3 मिमी), पेठशिवणी (68.3), पूर्णा (67 मिमी), वडगाव (66.8 मिमी) या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या जोरदार पावसाने आधीच ओसंडून वाहणारे नदी, नाले आणि ओढे यांना अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास पूर्णा- नांदेड रोडवर चुडावा येथील नदीला पुर आल्याने वाहतूक ठप्प झाली. तर आहेरवाडी -पूर्णा हा मार्गही बंद झाला. इंद्रायणी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. पालम तालुक्यात ही पुयनी, लेंडी नदीला पूर आल्याने 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला. सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ – विटा खु., शेळगाव – थडी उककडगाव, लोहिग्राम, उककडगाव आदी गावचे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

शिवाय सेलू तालुक्यातील हदगाव – केदारवाडी, सेलू – मोरेगाव, राजेवाडी – वालुर, इरळद – सोन्ना ह्या मार्गांवरील वाहतुक बंद झाली आहे. शिवाय सततच्या पावसाने आणि नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक भागात शेत पिके पाण्याखाली गेली आहेत.

Comments are closed.