परभणी : येथे लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी (दि.24) महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चासाठी विविध जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधव हजारोच्या संख्येने परभणीत दाखल झाले होते. शहरातील शनिवार बाजार येथून या मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी या मुख्य मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला.
लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची केंद्र सरकारकडे शिफारस करा, राज्यातील लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करा, महाराष्ट्र राज्यात लिंगायत बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करा. मंगळवेढा येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करा. लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या मृत्यु प्रकरणाची उच्चस्तरीय (CBI) चौकशी करा आणि परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभा करावा अशा विविध मागण्यांसाठी आज हा मोर्चा काढण्यात आला.
या महामोर्चात जगदगुरु श्री.चन्नबसवानंद महास्वामी, जगदगुरु श्री.बसवकुमार स्वामी, प्रभुलींग स्वामी, आनीमेशानंद स्वामी, ॲड. अविनाश भोसीकर, प्रा.किरण सोनटक्के, समन्वयक किर्तीकुमार बुरांडे यांच्यासह लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Video :
Comments are closed.