Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देणारा आधुनिक काळातील देवदूत म्हणजे ‘पंजाब डख’आहे तरी कोण?

आपण बरेचदा असे म्हणतो की मी देव पाहिला नाही पण काही माणसे अशी असतात जी आपल्या अलौकिक व दैदिप्यमान कामगिरीने देवासारखी वाटायला लागतात.जेंव्हा सचिन उघडे नामक शेतकरी म्हणतो पंजाबराव तुम्ही माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांसाठी देवदूत आहात तेंव्हा मन भरून येते.

सध्या सर्व महाराष्ट्र राज्यात असंख्य शेतकऱ्यांना देवदूत म्हणून मदतीला धावून जाणारे कोणी असेल तर ते आहेत पंजाबराव डख. अर्जुनाने जसा नेम लावताना पक्ष्याचा डोळा मला दिसतोय असे सांगितले तसे हवामानाचा अचूक वेध घेणारे व माझ्या शेतकरी राजाला १५ दिवस अगोदर पुढे होणारे हवामानातील बदल सांगणारे पंजाबराव डख.

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात गुगळी धामणगाव सारख्या छोट्या खेड्यात दि.७/७/१९७८ ला पंजाबरावांचा जन्म सुभद्रा मातेच्या पोटी झाला.वडील उत्तमराव व पत्नी शीतल,मुले पृथ्वीराज व ऋतूराज असा त्यांचा परीवार आहे.

१९९५ पासुन सातत्याने हवामानाचा अभ्यास करत असून २००३ साली त्यांनी सिडॅक कंप्युटर कोर्स पूर्ण केला.खास करून इतर देशांतील उपग्रह व हवामान पाहणी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.पंजाबराव सांगतात की,मी इयत्ता ८ वी मध्ये होतो त्या वेळेपासून पाऊस व हवामान अंदाज सांगत होतो.माझ्या बळीराजाची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे हवामानाचा फटका त्यांना बसणार नाही असा माझा प्रयत्न असे.पूर्वी प्रसार माध्यम नव्हते नंतर २००४ साली मोबाईल घेतला त्या द्वारे संदेश पाठवून सतर्क करत असे.पण ते सर्वांना भेटत नसत.

योगायोगाने २०१३ साली व्हाट्सप आले.मग त्यांनी ठरवले की,३६ जिल्ह्यातील ३६ ग्रुप बनवायचे.इथुन पुढचा प्रवास थक्क करणारा आहे.त्यांनी पूर्व विदर्भ,पश्र्चिम विदर्भ,दक्षीण महाराष्ट्र,पश्र्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी, मराठवाडा,खानदेश असे भाग करून शेतकऱ्यांना संदेश पाठवण्याचे काम सुरू केले.

कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे याचं एका प्रांजळ हेतूने ते हे महान कार्य करतात.आज त्यांचे ५६० ग्रुप असुन महाराष्ट्र राज्यातील १लाख ४३ हजार ९२० शेतकरी त्यांना जोडले गेले आहे.

तसेच पंजाब डख नावाचे स्वत:चे युटयुब चैनल असुन लाखो शेतकरी या वरील व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतात.बळीराजा साठी पंजाबराव करत असलेले काम पाहून मन भरून येते व सार्थ अभिमान वाटतो असे त्यांचे साडूभाऊ वसंत बापू डख सांगतात.

कुठलीही शासकीय नोकरी नसताना असा अचूक हवामान अंदाज सांगत लाखो शेतकऱ्यांना ते देवदूता सारखे वाटतात.महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात त्यांच्या सत्काराचे आयोजन केले जाते.आज पंजाबराव डख हे नुसते नाव नसून एक विश्र्वास,एक खात्रीचे प्रतीक बनले आहे. या शेतकऱ्यांसाठी देवदूत असणार्या पंजाबरावांना शासनाने हवामान खात्यात सेवेची संधी द्यावी ही एक अपेक्षा व्यक्त करतो.

पंजाबरावांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन शेवटी एवढेच सांगतो.

“कई जीत बाकी है
कई हार बाकी है
अभी तो जिंदगी का
सार बाकी है
चल पडे है नई मंजील की ओर
यह तो बस एक पन्ना था
पुरी किताब अभी बाकी है…”

लेखक
श्री.योगेश ढवारे सहशिक्षक
श्री.केशवराज बाबासाहेब विदयालय सेलू जिल्हा परभणी
संपर्क- ९५६१९५३७३८

(लेख लिहिणारे लेखक यांचे भाषण एक कला, उपक्रमशील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम,अशी ही काव्यफुले ही पुस्तके प्रकाशित आहेत)

Comments are closed.