Take a fresh look at your lifestyle.

रस्त्यांच्या कामांना आपल्याच काळात मंजुरी : आमदार नीलेश लंके

नगर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांना आपल्या काळात मंजुरी मिळाली आहे. त्या कामांसाठी आपण पाठपुरावा केला होता. आता त्यासाठी निधी मंजूर झाल्याने, या कामाचे श्रेय आपलेच आहे. त्यामुळे या कामांचे भूमिपूजन करण्याचा अधिकारही आपलाच आहे, असे आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी विविध कामांचे भूमिपूजन करीत, या कामांमध्ये कोणी खोडा घातला तर आपण सर्वांचे बाप आहोत, असा इशारा दिला होता. औटी यांनी कामांचे भूमिपूजन केले खरे, मात्र दोन महिने उलटले तरी काम सुरूच झाले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते व शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी, कामे सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता.

त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी, काही कामे सुरू झाली असून, काही कामे आठ दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामे सुरू झाल्याचा दावा दाते व रोहोकलेंनी केल्यावर त्यावर आमदार लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लंके म्हणाले, की उद्या कोणीही उठेल व भूमिपूजन करेल आणि काम सुरू झाले नाही म्हणून उपोषणाचा इशारा देईल. याला काहीच किंमत नाही.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे व मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतरच कामे सुरू होतील. एखाद्या रस्त्याची साफसफार्ई सुरू झाली म्हणजे काम सुरू झाले, असे कसे म्हणता येईल, अशी टीका लंके यांनी केली. सरकारी कामाचे भूमिपूजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित असावे लागतात.

कामे मंजुरीचा कोणीही दावा केला, तरी त्याला निधी कोणाच्या काळात मिळाला? अर्थमंत्री कोण आहे, याची माहिती घ्यावी. स्वतःच नारळ फोडून कोणी स्वतःची पाठ थोपटून घेणार असेल, तर तालुक्यातील जनता दुधखुळी नाही, असा टोलाही लंके यांनी लगावला.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका