Take a fresh look at your lifestyle.

प्रोत्साहन अनुदान योजनेची घोषणा हवेतच

शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार ? उदासिनता म्हणायची की मुहूर्त सापडेना शेतकऱ्यांचा सरकारला संतापजनक सवाल

सेलू : कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गतवर्षी आणि यावर्षीदेखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेची केलेली घोषणा हवेतच विरली असून सरकारला या योजनेचा विसर पडला की मुहूर्त सापडत नाही ? खरीप हंगाम समाप्त होऊन रब्बी हंगाम देखील अर्ध्यावर आला आहे. मात्र प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार ? असे संतापजनक सवाल सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सरकारला केला जात आहे.

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गतवर्षी आणि यावर्षीदेखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र अद्यापही या घोषणेची अमलबजावणी सुरू झालेली नाही. मग आम्ही पण यापुढे थकबाकीदार व्हायचे का असा खोचक सवालही शेतकरी करत आहेत. दरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या जाचातून मुक्ती देण्यासाठी 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना लागू करून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व 30 सप्टेंबर पर्यंत व्याजासह दोन लाखाच्या मर्यादेत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर शासनामार्फत वर्ग करण्याची तरतूद केली. दोन लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रकमेचा भरणा करण्याचे प्रावधान देण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्या व चालू थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजनेची घोषणा केली होती. या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासित केले होते. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सरकारचे हे आश्वासन हवेतच विरले असल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होत आहेत. दरम्यान फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पुन्हा सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेअंतर्गत 50 हजार रुपये अनुदान तसेच दोन लाखावर कर्ज असलेल्यांना देखील न्याय देऊ असे आश्वासित केले होते. परंतु वर्ष उलटून गेले तरी सरकारची ही प्रोत्साहन योजना अद्यापी गुलदस्त्यातच आहे. याबाबत कोणतीच हालचाल अथवा निर्णय होत नसल्याने सरकारने नव्याने दिलेले आश्वासनही अजून हवेतच आहे. अशा संतापजनक प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून उमटत आहेत. आम्ही बोललो ते करून दाखवतो असे म्हणणाऱ्या मायबाप सरकारने घोषणा केल्या प्रमाणे करून दाखवावे हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

 डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.