Take a fresh look at your lifestyle.

बेवारस पुरूष जातीचे बाळ सापडल्याने सेलूत खळबळ

अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असल्याचा संशय

सेलू :- सेलू-परतूर रोडवर गणराज धाब्याजवळ रस्त्याच्या कडेला गुरूवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता बेवारस पुरूष जातीचे दिड महिन्याचे एक बाळ सापडल्याने हा हा म्हणता सेलू शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

या घटने संदर्भात प्राप्त माहिती अशी की सेलू येथील सौरभ थोरात व निशान जोग हे दोघे गुरूवारी सकाळी सेलू-परतूर रोडवर मॉर्निंग वॉकला जात असताना शहराच्या दिड किलोमीटर अंतरावर गणराज ढाब्या जवळ त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने त्यानी शोध घेतला असता रस्त्याच्या कडेला खड्यात सदर बाळ दिसून आले. त्यानी त्वरित महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी उद्धव मोरे यांना कळविल्या नंतर बाळाला उपजिल्हारुग्णालयात दाखल केले. तपासणी अंती त्या बाळाचे वजन अडीच किलो व प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने त्या बाळास बाल कल्याण समिती परभणी येथे हलवले आहे. सेलू पोलिस ठाण्यात या प्रकरणी कलम ३१७ नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्या बाळाच्या मातापित्ताचा शोध घेत आहेत.

□दिपाली बेडकरला रडू कोसळले!

शहरातील शाहू नगर येथील रहिवासी दिपाली बेडकर यांनी तातडीने उपजिल्हा रूग्णालयात जाऊन सदर बाळाला जवळ घेऊन त्याला दुध पाजून नवे कपडे घातले. आपल्याला मुलबाळ नसल्यामुळे सदरील बाळ दत्तक मिळावे यासाठी दिपाली बेडकर विनंती करू लागल्या. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय असे बाळ दत्तक घेता येत नाही हे समजल्यानंतर दिपाली बेडकर यांना अक्षरशः रडू कोसळले. एकीकडे जन्म देणाऱ्या मातेने निर्दयपणे बाळाला रस्त्यावर फेकून मातृत्वाला काळीमा फासला तर दुसरीकडे हे बाळ दत्तक मिळावे म्हणून हंबरडा फोडणार्‍या दिपालीने मातृत्वाला पान्हा फोडला…

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.