Take a fresh look at your lifestyle.

शेतकरीपुत्र ते 19 व्या वर्षी सैन्यात अधिकारी; जाणून घ्या कोण आहे सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा…

नीरज चोप्राने आज टोकयो ऑलिंपिक मध्ये भालाफेक या खेळात इतिहास घडवला आहे. ज्या सुवर्णपदकाची सर्व भारतीयांना मागील 13 वर्षापासून प्रतीक्षा होती, आज नीरज चोप्राने भालाफेकीत ती प्रतीक्षा संपवली. नीरजने चमकदार कामगिरी करत सर्व खेळाडूंना हरवून सुवर्णपदक पटकावले.

नीरजने अंतिम फेरीत आपले वर्चस्व कायम ठेवत पहिल्याच थ्रोमध्ये भाला 87 मीटर दूर फेकला. यानंतर, दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने 87 मीटरपेक्षा जास्त दूर भाला फेकला. त्या एका थ्रोने त्याचे सुवर्णपदक निश्चित केले. पंतप्रधान मोदींसंह अनेक मोठ्या नेत्यांनी त्याचे अभिनंदन केले. देश-विदेशातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या लेखामध्ये नीरज चोप्राविषयी माहीती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

नीरज चोप्रा हरियाणा राज्यातील आहे…

नीरजचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात एका छोट्या शेतकरी कुटुंबात झाला. नीरजने चंदीगडमधून शिक्षण घेतले. 2016 मध्ये पोलंड या देशात झालेल्या IAAF वर्ल्ड अंडर -20 चॅम्पियनशिपमध्ये नीरजने 86.48 मीटर दूर भाला फेकून सुवर्ण जिकले होते. त्यानंतर त्याची लष्करात कनिष्ठ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली .

लष्करात नोकरी मिळाल्यानंतर नीरजने एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझे वडील शेतकरी व आई गृहिणी आहे आणि मी संयुक्त कुटुंबात राहतो. माझ्या कुटुंबात कुणालाही सरकारी नोकरी नाही. म्हणून प्रत्येकजण माझ्यासाठी आनंदी आहे.” तसेच ही नोकरी मिळाल्यानंतर मी माझे प्रशिक्षण सुरू ठेवत घरच्यांना आर्थिक मदत करू शकतो, यामुळे मी खूश असल्याचे नीरज यांनी संगितले.

जेव्हा त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला…

2018 मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 88.06 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा नीरज पहिला भारतीय आहे. आशियाई खेळांच्या इतिहासात भारताला आतापर्यंत भालाफेकमध्ये फक्त दोनच पदके मिळाली आहेत. नीरजच्या आधी, गुरतेज सिंगने 1982 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

2018 मध्ये  आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर नीरजच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे तो बराच काळ तो खेळापासून दूर राहिला. 2019 मध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. 2020 मध्ये कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या होत्या.

मात्र त्यानंतर, नीरजने यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंडियन ग्रां.प्री. मध्ये 88.07 मीटरचा थ्रो फेकून स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरजची आजपर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

टोकियोपर्यंतचा प्रवास

नीरज चोप्राला गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सेंट्रल नॉर्थ ईस्ट मीटिंग अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. आज त्याने या खेळत सुवर्णपदक जिंकत देशाची मान अभिमानाने उंचावली.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका