Take a fresh look at your lifestyle.

पारनेरमधील पळशीत ढगफुटीसदृश पाऊस…

नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी (ता. ७) पहाटे पारनेर तालुक्यातील पळशी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाने काळू नदीकाठच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनकुटे रस्त्यावरील काळू नदावरील पूल पुराने वाहून गेला आहे. पळशीत १२६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सकाळपर्यंत जिल्ह्यात तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
पारनेर तालुक्यातील पळशी, वनकुटे, खडकवाडी, ढवळपुरी, पोखरी हा तसा दुर्गम परिसर आहे.

शिवारात रात्रीपासून पाऊस सुरू होता. रात्री अकरा वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस पहाटे तीन ते चारवाजेपर्यंत सुरूच होता. अचानक झालेल्या जोरदार पावसाने या भागातून वाहणाऱ्या काळू नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतपिकांचे, भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. या शिवाय ढवळपुरी ते वनकुटे व पळशी ते वनकुटे या दोन्ही रस्त्यावरील दोन पूल वाहुन गेले आहेत. मुसळधार पावसाने या भागातील घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सकाळपर्यत घारगाव, राहुरी मंडलातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

पश्चिम पारनेर भागात दि. 6 च्या मध्यरात्री पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग जरी सुखावला असला तरी. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शेतात असलेल्या बाजरी व सोयाबीन पिकावर वरुण राजा बरसत असून काढणीला आलेले बाजरी पीक सध्या अडचणीत सापडले आहे.

पश्चिम पारनेर भागातील अळकुटी, कळस, म्हस्केवाडी, चोंभूत, लोणीमावळा ह्या भागात अत्यल्प प्रमाणात सुरवाती पासून पर्जन्य वृष्टी झाल्याने बाजरी, सोयाबीन व मका ह्या पीक लागवडीवर मोठा परिणाम होऊन. कमीत कमी क्षेत्र बाजरी,सोयाबीन, मका पिकांची आहेत. अश्या अवस्थेत कमी पावसात आलेली सदर पिकांवर काढणीच्यावेळी मुसळधार पावसाचे संकट आल्याने बाजरी पीक काढणीवाचून राहिले आहे.पश्चिम पारनेर भागातील अळकुटी, कळस, म्हस्केवाडी, चोंभूत, लोणीमावळा परिसरात मुसळधार पावसाचा ऊस पिकासाठी मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून बाजरी, सोयाबीन, मका उत्पादक शेतकरी चिंतातुर आहेत.

Comments are closed.