Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यात पावसाचे थैमान ! बापरे तब्बल एवढी जनावरे गेली पावसात वाहून

नगर : शेतक-यांसाठी पोळा सण महत्वाचा असतो. परंतू नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नगर व अन्य काही भागात पावसाने मोठे नुकसान केले. नद्यांना अचानक आलेल्या  पुरामुळे संधी मिळाली नसल्याने एकट्या शेवगाव तालुक्यात दोन हजार जनावरे वाहून गेली. 168 जनावरांचा दावणीलाच पाण्यात गुदमरुन मृत्यू झाला. त्यामुळे काल सोमवारी दुखाःच्या छायेतच शेतकऱ्यांना पोळा साजरा करावा लागला.

शेवगाव, पाथर्डी तालुक्यात बैल पोळयावर यंदा अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे सावट आहे. नंदिनी, चांदणी, ढोरा, वटफळी, भागीरथी, काशी या नदयांच्या पुरामुळे तालुक्यातील १५ गावातील पशुधन वाहुन गेले. तर गोठयात पाणी शिरल्याने अनेक जनावरे पाण्यात बुडून जागेवरच गतप्राण झाले. या पार्श्वभुमीवर झालेल्या नुकसानीची अदयाप भरपाई मिळाली नसल्याने यंदाचा पोळा हा सण दु:खाच्या व निराशेच्या छायेत शेतक-यांनी साजरा केला.

कायम दुष्काळी असलेल्या शेवगाव तालुक्यात वर्षभर जनावरे जगवण्यासाठी त्यांना चारा पाणी करण्यासाठी मोठा संघर्ष शेतक-यांना करावा लागतो. तरी देखील अनेक भागातील शेतकरी गाय,बैल, म्हशी, शेळ्या, मेंढया यांचे पालन करुन शेतीला दुग्धव्यवसाय व इतर व्यवसायाची जोड देतात. दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उतरलेल्या दुधाच्या भावामुळे शेतक-यांना पदरमोड करुन जनावरे पोसावी लागत आहेत.

शिवाय गेल्या वर्षी पासून तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून त्यामुळे विविध आजाराने पशुधन कशीबशी वाचवण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. यंदा गेल्या आठवडयात ३१ आँगस्ट रोजी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नंदिनी, चांदणी, ढोरा, वटफळी, भागीरथी, काशी या नदयांना मोठया प्रमाणावर पूर आला. पुराचे पाणी अनेक शेतक-यांचा घरात, वस्तीवर, गोठयात शिरले. पुराचे संकट जिवावर आलेले असतांना शेतक-यांनी स्वत:चा व कुटूंबियांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला.

मात्र गोठयातील दावणीची जनावरे पाण्यात बुडून तर सोडलेली जनावरे पुरासोबत वाहुन मृत झाली. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात तालुक्यातील दहा गावातील १६८ जनावरे मृत झाली तर १९८२ जनावरे वाहून गेली आहते. गेल्याच आठवडयात आलेल्या पुराच्या या तडाख्यातून शेतकरी अदयाप सावरलेला नाही. सर्वाधिक फटका शेवगावमधील लांडे वस्तीला बसला तेथील ७९४ जनावरे वाहून गेली, तर ५४ जागेवरच मृत्यूमुखी पडली. या शिवाय कांबी, हातगाव, ठाकुर पिंपळगाव, बोधेगाव या परीसरामध्ये देखील अतिवृष्टी व पुरामुळे जनावरे मृत्यूमुखी पडली तर काही वाहुन गेली आहेत. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार मिळणा-या नुकसान भरपाईकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे. यांत्रिकी करणामुळे बैलांची व जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याने ग्रामिण भागात पोळयाच्या सणाला निरुत्साह दिसुन आला.

Comments are closed.