Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडी सरकारला विद्यार्थ्यांच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही – आ.मेघना बोर्डीकर

परभणी/प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारला विद्यार्थ्यांच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही, स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम सरकार करत आहे. पण, आपण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. विद्यार्थी जेंव्हा जेंव्हा बोलवतील तेंव्हा तेंव्हा त्यांच्या समस्येसाठी रस्त्यावर येवून संघर्षास आपण तयार आहोत, असे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

आ.बोर्डीकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविला. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने बुधवारी (दि.27) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात आंदोलन करण्यात आले. प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. या प्रसंगी अ‍ॅड. अमोल गिराम, आकाश लोहट, शिवाजी शेळके, दैवत लाटे यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दि.24 ऑक्टोबरच्या आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना झालेला त्रास व ढिसाळ नियोजन याचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळास जबाबदार असणार्‍यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, न्यास कंपनीकडील परीक्षा घेण्याचे टेंडर रद्द करावे, पोलीस भरती पूर्ववत प्रथम ग्राउंड व नंतर लेखी परीक्षा या प्रमाणे व्हावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सरळसेवेच्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात याव्यात. सर्व स्पर्धा परीक्षेचे वर्षभराचे वेळापत्रक जाहीर करावे यासह विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

Comments are closed.