मानवत तालुक्यातील नीलवर्ण टाकळी गावातील घटना; गावाचा संपर्क तुटला मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथे माहेरी आलेल्या 22 वर्षीय गरोदर विवाहितेला पुराच्या पाण्यातून थर्मोकोलच्या तराफ्यात झोपवून जीव धोक्यात घालत नदी पार करून रुग्णालयात नेण्यात आले. महिला वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने तिची सुखरूप प्रसूती झाली आहे. याबाबतचा व्हिडिओ समोर आला असून या घटनेवरून परभणी जिल्ह्यातील दळणवळणाची अवस्था किती वाईट आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी शिवकन्या अंगद लिंबुरे ही 22 वर्षीय विवाहिता गरोदर असल्याने बाळंतपणासाठी माहेरी मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण (जि. परभणी) येथे माहेरी आलेली होती. दोन-तीन दिवसापासून तिच्या पोटात दुखु लागले होते. परंतु बोरी नदीला पूर आल्याने वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद झाल्याने साहजिकच गरोदर विवाहितेला घेऊन तिच्या कुटुंबाला नदी ओलांडून जाणे शक्य झाले नाही.
बोरी नदीला जास्त पाणी असल्याने तिला दवाखान्यात नेता आले नाही. तर, डॉक्टरांना देखील गावात येणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत तिच्या पोटात कळा येवून तिला अस्वस्थ वाटू लागले, अशातच तिची प्रकृती बिघडू नये म्हणून भाऊ उमेश उत्तम कटारे, राहुल कटारे व इतर नातेवाईकांनी महिलेला नदी काठावर आणीत गावकर्यांच्या मदतीने धाडस केले. नाईलाजाने तिला थर्माकोलच्या तराफ्यावर बसवून नदी ओलांडून मानवत येथे ग्रामीण दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले.
माहेरी आलेल्या लेकीच्या सुखरूप बाळंतपणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून, चार-पाच जणांच्या सहायाने टायरच्या ट्यूब व इतर वस्तूच्या आधाराने नदी पार करीत मानवतचे रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासले व दाखल करून उपचार सुरू केल्यावर काही वेळातच त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची सुखद वार्ता डॉक्टरांनी दिली आहे.
Video
Comments are closed.