Take a fresh look at your lifestyle.

मोठा निर्णय: ‘या’ तारखेपासून सुरू होणार राज्यातील शाळा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: कोरोना प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. सध्या विद्यार्थी ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. मात्र ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत किंवा ज्या गावात इंटरनेट कनेक्शन नाही अशा विद्यार्थ्यानी काय करायचं हा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे अनेक गावांनी शाळा परत सुरू करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत असून, राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

पत्रकारांशी बोलत असताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, “राज्यातील सर्व शाळा लवकर सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार असू, येत्या 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा विचार विभाग करत आहे. ज्या भागात रुग्णसंख्या कमी आहे आणि ज्या भागातील कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. त्या भागातील शाळा सुरू करण्याचा विचार आहे. तसेच ग्रामीण भागात पाचवी ते आठवी आणि  शहरी भागात आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा आमचा मानस आहे.”

शिक्षण विभागाने सुरू केल्या हालचाली

केंद्राने 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली. यात शाळा सुरू करायचे की नाही याबाबत सर्व अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मागील वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार असून अंतिम निर्णय तेव्हाच घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरच शाळा सुरू होतील, असंही त्या म्हणाल्या.

Comments are closed.