Take a fresh look at your lifestyle.

पालम तालुक्यातील लेंडी, गळाटी नद्यांना पूर; 14 गावांचा संपर्क तुटला

पालम : मागील 3 दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसाने पालम तालुक्यात हाहाकार माजविला आहे. तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह बहुतांश नद्याना पूर आल्याने गुरुवारी (दि.23) 14 गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला होता. पालम तालुक्यात सातत्याने वृष्टी होत आहे. त्यातच तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु झाला. तो गुरुवारी सकाळपर्यंत थांबला नव्हता. त्यामुळे पालम तालुक्यात पाणीच पाणी झाले असून सर्व नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला आहे.

गोदावरी नदीची पालम तालुक्यातील प्रमुख उपनदी असलेली गळाटी व लेंडी नदीला गुरुवारी पहाटेपासून पूर आला आहे. दोन्ही नद्यांचे पाणी पात्र सोडून जवळपास दोन हेक्टर क्षेत्रावरून वाहत आहे.  लेंडी नदीच्या पुरामुळे बुधवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास नऊ गावांचा संपर्क तुटला होता. तो गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा नदीला पूर आल्याने ही गावे संपर्काबाहेर गेली.

प्रामुख्याने पुयनी येथील पुलावरून लेंडी नदीचे पाणी वाहू लागल्याने गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी, तेलजापुर आणि गणेशवाडीचा संपर्क पालम शहराशी तुटला. दुसरीकडे याच नदीवरील पालम शहरालगतच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड या गावांचा संपर्क देखील तुटला.

तर गळाटी नदीवरील सायळा ते सिरपूर दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे गुरुवारी सकाळी 11.45 वाजल्यापासून सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडीचा संपर्क पालमशी तुटला होता. पावसामुळे गुळखंड येथील कोरोना लसीकरण रद्द करण्यात आले. त्यानंतर हळूहळू पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली होती.

Comments are closed.