Take a fresh look at your lifestyle.

सलग 11 वेळा आमदार राहूनही साधे जीवन जगणार्‍या आबांचे किस्से ऐकून विश्वास बसणार नाही

सांगोला: तब्बल 11 वेळाआमदार म्हणून निवडून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचे काल निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्यामुळे समाजातील सर्व वर्गांच्या समस्यांची जाणिव असणारा ध्येयवादी नेता गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार होऊन सुद्धा त्यांनी साधे जीवन जगणेच पसंत केले. त्यांनी कधीही लोकांना वाटू दिले नाही की ते एक आमदार आहेत. साधं नगरसेवक झालं तरी अनेकांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. त्यांच्या मध्ये एक नवीनच तोरा आलेला असतो. चारचाकी शिवाय ते कुठे जात नाहीत. मात्र, गणपतराव फार वेगळे होते. उभ्या आयुष्यात त्यांनी फक्त एसटी बसनेच प्रवास केला. मग ते मुंबईला जायचे असो वा नागपूरला.

करायचे फक्त एसटी प्रवास…

त्यांच्या एसटी प्रवासाविषयी एक फार मजेदार किस्सा आहे. एकदा एसटीने प्रवास करत असताना बसच्या वाहकाने त्यांना तिकीट विचारलं, तेव्हा गणपतराव यांनी सांगितले की मी आमदार आहे, मला तिकीट काढायची गरज नाही. मात्र, त्या वाहकाला ही गोष्ट खरी वाटत नव्हती कारण एवढा मोठा आमदार बस ने कसा काय प्रवास करू शकतो ? असं त्या वाहकाला वाटलं. त्यामुळे त्याने गणपतरावांशी वाद घालायला सुरुवात केली. शेवटी गणपतरावांना बस डेपोतील अधिकार्‍यांना बोलवावं लागलं. त्या अधिकार्‍याने गणपतरावांना ओळखलं आणि त्या वाहकाला त्यांची माफी मागायला लावली अन तेथून त्यांचा प्रवास व्यवस्थित झाला.

बनू शकले असते मुख्यमंत्री…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही त्यांच्याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला होता. 2020 मध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, 1999 विधानसभा निवडणूकींच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर पेचप्रसंग निर्माण झाला होता. मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा की भाजपचा यावर एकमत होत नव्हते. आणि पूर्ण बहुमत नसल्यामुळे आमदार आपल्याला पाठिंबा देतील असे वाटत नव्हते. त्यावेळ शेकापचे 3 आमदार निवडून आले होते. त्यावेळी नारायण राणेही नको आणि गोपीनाथ मुंडेही नको… गणपतराव देशमुख यांना मुख्यमंत्री करा .. असा विचार आला. त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली होती. पण काही कारणाने तसं झालं नाही.

मिळत होते सर्वात जास्त पेंशन पण स्वतः साठी काहीच खर्च केला नाही…

जनतेच्या सेवेसाठी मेहनत घेणार्‍या माजी आमदारांना राज्य शासन पेन्शन देते. सध्या शासन राज्यातील 789 आमदारांना पेन्शनचा लाभ देते. यात गणपतराव देशमुख सर्वाधिक पेन्शन घेणार्‍या माजी आमदारांच्या यादीत अव्वल स्थानी होते. त्यांना तब्बल 1 लाख 40 हजार प्रती माह पेन्शन मिळायचे. मात्र यातील एकही रुपया ते स्वतःसाठी खर्च करत नसत. ते या पैश्यांचा वापर गरजूंना मदतीसाठी आणि इतर विकासकामासाठीच करत असत. त्यांनी कोविडकाळातही त्यांचे पेन्शन दान करत मदत केली. त्यांनी  इतर विद्यमान आमदारांना आणि माजी आमदारांनाही तसे करण्याचे आवाहन केले होते.

Comments are closed.