नगर : ठाकरे सरकार माफियांचे सरकार आहे. ते स्थापन झाल्यापासून त्यांनी राज्यात हाहाकार उडविला. लोकांना घराबाहेरसुद्धा पडू देत नाहीत, ना गणेशदर्शन, ना देवदर्शन. या सरकारचा जन्मच मुळात भ्रष्टाचार व माफियागिरीतून झाला असल्याचा घणाघाती आरोप भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केला. पारनेर कारखान्यातील कामगार, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सोमय्यायांनी सांगितले.
पारनेर येथे पारनेर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी सुरू झालेल्या ईडी व पोलिस खात्याच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पारनेर कारखाना बचाव कृतिसमितीने सोमय्या यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी, ‘मी पारनेरला येऊन कारखान्याला भेट देऊन शेतकरी व कामगारांशी संवाद साधेन. कारखाना विक्रीप्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराबाबत बोलेन,’ असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या आज गुरुवारी पारनेरला आले होते.
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सोमय्या म्हणाले, या सरकारचा जन्मच मुळात भ्रष्टाचार व माफिया गिरीतून झाला आहे. पारनेर कारखाना क्रांती शुगरने विकत घेतला. तो विकत घेण्यासाठी 32 कोटी रुपये कसे जमा केले, ते कोणत्या मार्गाने दिले, क्रांती शुगरकडे पैसेच नव्हते, तर त्यांना लिक्विडेटरने कारखाना विकलाच कसा, असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले. तसेच, कारखान्याने कर्जापोटी राज्य सहकारी बँकेकडे पैशांची मागणी केल्यानंतर याच बँकेने कर्ज कसे दिले, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शेतकरी व कामगार हितासाठी कारखाना चालला पाहिजे. मात्र, त्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांना शिक्षाही झाली पाहिजे. यावेळी भाजपचे नेते बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंढे, कारखाना बचाव कृतिसमितीचे रामदास घावटे, बबन कवाद, साहेबराव मोरे, विश्वनाथ थोरात, अश्विनी थोरात, सुनील थोरात, सागर मैड, सुभाष दुधाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.