Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो! ऑनलाईन ‘करिअर कट्टा’ मध्ये सहभागी व्हा- प्राचार्य डॉ. जाधव

परभणी : युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाइन सुरू झालेल्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमात श्री शिवाजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले आहे. राज्य पातळीवरील करिअर कट्टा उपक्रमाच्या श्री शिवाजी महाविद्यालयात क्यू. आर. कोड नामफलकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. रोहिदास नीतोंडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे तसेच करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक डॉ. रामानंद व्यवहारे, ग्रंथपाल डॉ. रामदास टेकाळे, डॉ एस. एन. लोणकर, डॉ मदन परतूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र करिअर कट्टा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले की, आयएएस, आयपीएस, एमपीएससी ,रेल्वे, पोस्ट, बँक इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाद्वारे करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘आय. ए. एस.’ आपल्या भेटीला या कार्यक्रमात सहभागी व्हावे. ज्यांना उद्योजक बनण्याची इच्छा आहे त्यांनी ‘उद्योजक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण देऊन सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीप्रमाणे करिअरच्या दिशा दाखवून त्यामध्ये सक्षम करण्याची ताकद करियर कट्टा या उपक्रमात आहे. त्यामुळे श्री शिवाजी महाविद्यालयात केंद्र सुरू केल्याचे प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले

कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक अशा सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा मध्ये सहभागी होऊन आपला सर्वांगिण विकास करावा. विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे तसेच गुणवत्तेनुसार शिक्षण प्रशिक्षनासह मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची सोय करिअर कट्टा मध्ये आहे. त्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयामधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. असे करिअर कट्टा चे महाविद्यालयीन आणि परभणी जिल्हा समन्वयक डॉ. रामानंद व्यवहारे यांनी सांगितले.
ऑनलाईन साधनांच्या आजच्या काळात शेतात झाडाखाली, घरी, झोपडीत असे कुठेही बसून जगातील सर्व उत्कृष्ट माहिती, ज्ञान देण्याची मोठी ताकद करिअर कट्टा मध्ये असल्याचे सांगून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा केंद्राचा फायदा घेऊन मोठे होण्याचे आवाहन डॉ. रोहिदास यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Comments are closed.