Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी ! तहसीलदार ज्योती देवरेंची ‘या’ जिल्ह्यात बदली

नगर : वादग्रस्त ठरलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची आज जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे मला आत्महत्या करावीशी वाटते, अशी व्हिडिओ क्लीप व्हायरल केली होती. त्यानंतर त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. आमदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या घटनेची महिला आयोगामार्फत त्रिसदस्यीय समितीने चौकशीही केली. शेवटी देवरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

देवरे या पारनेरला हजर झाल्यापासूनच अनेकदा वादग्रस्त ठरल्या होत्या. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात त्या हजर झाल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी केलेल्या विविध कारवाईच्या वेळीही त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. मात्र त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्या काळात त्यांनी जनजागृतीसाठी केलेले व्हिडिओ गाजले होते. मात्र त्यांचे आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचे सूत कधीच जुळले नाही. त्यामुळे त्या सतत वादग्रस्त ठरल्या. त्यानंतर तहसील कार्यालयातील तलाठी मंडल अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. त्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आठ दिवसांनंतर चौकशी करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
नुकतीच त्यांची, ‘मला लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करावीशी वाटते’ ही व्हिडिओ क्लिप राज्यभरात गाजली होती. त्यांनी या क्लिपमध्ये लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांवरही आरोप केले होते. तसेच महिला आयोगाकडे याबाबत चौकशीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. त्या समितीनेही देवरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचा अहवाल दिल्याने आयुक्तांनी तसे वरिष्ठांना कळविले होते.

देवरे यांच्या कथित क्लिपमुळे त्या वादग्रस्त ठरल्यानंतर लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी यांनी थेट देवरे यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. तसेच काही दिवसांपासून तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नगर व नाशिक आयुक्ताकडे तक्रारी केल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नाशिक आयुक्तालयासमोर धरणे आंदोलनही केले होते.

Comments are closed.