Take a fresh look at your lifestyle.

अरेरे…अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतरही कंगालच राहील तालिबान, IMF ने ‘हे’ काम केले आहे

काबूल. अफगाणिस्तान आणि अमेरिकन सैन्याविरुद्धच्या तब्बल 20 वर्षांच्या लढाईनंतर अफगाणिस्तान देश तालिबानच्या ताब्यात आला आहे. मात्र, यानंतरही तालिबान्यांच्या नशिबाचे दार उघडणार नसून ते दरिद्रीच राहतील असे चित्र दिसत आहे. वास्तविक, अमेरिकेनंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने 706 अब्ज रुपयांची मालमत्ता गोठवल्यानंतर आता आयएमएफने अफगाणिस्तानच्या संसाधनांच्या वापरावर बंदी घातली आहे.

IMF ने तब्बल 3,400 कोटी रुपयापेक्षा जास्त असलेले आपत्कालीन रिजर्व वापरण्यास घातली बंदी

एएनआय या वृत्तसंस्थेने मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अफगाणिस्तानच्या 460 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (3416.43 कोटी रुपये) च्या आपत्कालीन रिझर्वमध्ये तालिबानचा प्रवेश रोखण्याची घोषणा केली आहे. देशावर तालिबानच्या नियंत्रणामुळे अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. म्हणूनच IMF ने हा निर्णय घेतला. आयएमएफने म्हटले आहे की तालिबानच्या ताब्यात असलेला अफगाणिस्तान यापुढे आयएमएफची संसाधने वापरू शकणार नाही. किंवा त्याला कोणतीही नवीन मदत मिळणार नाही.

अमेरिकेने 706 अब्ज रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता गोठवली
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, जो बिडेन प्रशासनाच्या दबावानंतर आयएमएफने हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी अमेरिकेने सुमारे 9.5 अब्ज डॉलर म्हणजे 706 अब्ज रुपयांहून अधिक किमतीच्या सेंट्रल बँक ऑफ अफगाणिस्तानची मालमत्ता गोठवली. एवढेच नाही तर अमेरिकेने अफगाणिस्तानला रोख पुरवठा करणे बंद केले आहे जेणेकरून देशाचा पैसा तालिबानच्या हातात जाणार नाही.

तालिबानने भारतातून आयात-निर्यातीवर बंदी घातली

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारतातून आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व मालवाहतुकीवर बंदी घातली आहे.

भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्स आणि कांद्यासारख्या वस्तू आयात केल्या जातात. तथापि, व्यापाराशी संबंधित उपक्रम लवकरच सुरू केले जातील अशी आशा करण्यात येत आहे, कारण ते दोन्ही देशांसाठी आवश्यक आणि फायदेशीर आहे.

दरम्यान, तालिबानने पत्रकार परिषद घेऊन सर्व राष्ट्रांना माफी जाहीर केली असून, अफगाणिस्तानचे हित लक्षात घेत इतर सर्व देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच भारतासह इतर देशांनी सुद्धा तालिबान विषयीचे आपले मत बदलावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

15 ऑगस्ट रोजी तालिबान ने काबुल वर ताबा मिळवत अफगाणिस्तानवर आपली सत्ता असल्याचे जाहीर केले आणि इथे शरिया कायदा लागू होणार असल्याचे स्पष्ट केले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी सध्या UAE मधील अबुधाबी शहरात आश्रय घेतला आहे.

Comments are closed.