Take a fresh look at your lifestyle.

‘भारत माता की जय’ पासून ‘जय हिंद’ पर्यंत; जाणून घ्या प्रेरणादायी घोषणांचा इतिहास

देशाचे राष्ट्रीय सण असो किंवा आपल्या मातृभूमीचा अभिमान बाळगणारा कोणताही दिवस असो – देशभक्तीपर घोषणांशिवाय तो दिवस अपूर्ण वाटतो. देशभक्तीशी निगडित घोषणा सीमेवरील सैनिकांच्या धैर्याला दुप्पट करतात. या घोषणा आम्हाला देशाविषयीच्या अभिमानाची अनुभूती देतात. तर या लेखात आपण या देशभक्तीपर घोषणांचा रंजक आणि प्रेरणादायी इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

‘भारत माता की जय’

ही घोषणा आपल्या सर्वांच्या जीवनात फार जवळची आहे. शाळेत असताना जेव्हा राष्ट्रगीत पूर्ण व्हायचे त्यावेळी लगेच ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या जायच्या. या घोषणेशिवाय राष्ट्रगीत पूर्ण वाटत नाही. ही घोषणा प्रथम किरणचंद्र बंडोपाध्याय यांनी भारत माता नावाच्या नाटकादरम्यान दिली होती. हे नाटक प्रथम 1873 मध्ये सादर करण्यात आले होते. पुढे ही घोषणा स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अधिक लोकप्रिय झाली. भारत माता की जय घोषवाक्य हे उर्दूमध्ये दिलेल्या ‘माद्रेवतान हिंदुस्तान जिंदाबाद’ या घोषवाक्याचे हिंदी रूपांतर आहे,असे सांगण्यात येते. हा नारा अजीम उल्ला खान यांनी 1873 मध्ये दिला होता, ज्याचा हिंदीमध्ये ‘भारत माता की जय’ म्हणून अनुवाद करण्यात आला.

जय हिंद

या घोषणेचा उपयोग सैन्यात एकमेकांचे अभिवादन करण्यासाठी देखील केला जातो. देशभक्तीची भावना निर्माण करणाऱ्या या घोषणेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य बनवण्यात आले होते. पहिल्यांदा हा नारा आझाद हिंद सेनेचे मेजर आबिद हसन सफराणी यांनी दिला होता. सेनेचे ब्रीदवाक्य बनल्यानंतर, देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर पोलीस आणि लष्कराने हा नारा स्वीकारला. हा नारा आजही सर्वाधिक वापरला जातो.

वंदे मातरम

वंदे मातरमचा नारा बंगाली कादंबरीकार आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी दिला होता. त्यांनी 1882 साली पहिल्यांदा हा नारा दिला होती. रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्याचा वापर केला. वंदे मातरम् हे आमचे राष्ट्रीय गाणे आहे.

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे  घोषवाक्य खरे तर संस्कृत स्तोत्र आहे. हे मुंडका उपनिषदातून घेण्यात आले. याचा उपयोग संस्कृत विद्वान आणि स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1918 मध्ये केला. यानंतर हे ब्रीदवाक्य खूप लोकप्रिय झाले आणि ते बोधवाक्य म्हणून वापरण्यात येऊ लागले.

इन्कलाब जिंदाबाद

हा नारा पहिल्यांदा क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांनी 1929 मध्ये वापरला होता. 1929 मध्ये सभागृहातील बॉम्बस्फोटानंतर त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ या घोषवाक्याचा वापर केला. आता ही घोषणा क्रांतीचे प्रतीक बनली आहे आणि जवळजवळ सर्व संघटना त्याचा वापर करतात.

यातील कोणता नारा तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटतो? हे आम्हाला तुम्ही खाली कमेंट्स बॉक्स मध्ये लिहिणं कळवू शकता.

Comments are closed.