सेलू (डाॅ विलास मोरे) : गुटखा सेवणामुळे अनेक तरूण व्यसनाधीन होऊ लागल्यामुळे प्रशासनाने गुटख्यावर बंदी लागू केली मात्र सेलू शहरासह संपूर्ण तालुक्यात गुटखा विक्री खुलेआम सुरु असुन याकडे अन्न व औषध आणि पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यातील तरूण व्यसनाधीन होऊ नये म्हणून प्रशासनाने गुटख्यावर बंदी लागू केली. मात्र प्रशासनाच्या आदेशाला बगल देत सेलू शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु असल्याचे आढळून आले. मागच्या अनेक दिवसांपासून सेलू तालुक्यात गुटखा विक्रेते सक्रिय झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कधीतरी एखादी कारवाई केल्याची नौटंकी करून शासनाच्या डोळ्यात धुळ टाकली जाते. मात्र बडे गुटखा विक्रेते व पुरवठा करणाऱ्यांवर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
इतर जिल्ह्यातून शहरात दलाला मार्फत गुटखा दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्व प्रकार संबंधित विभागाला माहीत आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही. परिणामी व्यसनाधीन तरुणांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली असुन त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. शिवाय गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तीकडून सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालय तहसील, पंचायत समितीच्या भिंतीवर पिचकाऱ्या मारून घाण केली जात आहे.
नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सेनगाव शहरासह तालुक्यातील गुटखा विक्री कायम बंद करून संबंधित गुटखा व्यावसायिकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातुन उपस्थित होऊ लागली आहे.
सेलू शहर बनले गुटखा विक्रीचे केंद्र….
सेलू शहरात अनेक बडे गुटखा विक्रेते असुन ते सेलू शहरासह तालुक्यात गुटखा विक्रीचा व्यवसाय करुन रोज लाखों रुपयांची उलाढाल करीत असल्याचे आढळून येत आहे. यातील काही गुटखा विक्रेत्यांनी सेलू पोलिस ठाणे हद्द सोडून इतर जिल्ह्यातही आपला गुटख्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे सेलू शहर हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले आहे.
Comments are closed.