सेलू :- ग्राम विकास अधिकारी अथवा ग्रामसेवकांनी मुख्यालयी रहावे असा आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिला असला तरी सेलू तालुक्यातील एकही ग्रामसेवक मुख्यालयी रहात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामसेवकच गावात नाहीत तर गावाचा विकास कसा होणार ? असा सवाल अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू तालुका कमिटीच्या वतीने पंचायत समिती व जिल्हा परिषदेला एका निवेदनाद्वारे केला आहे.
सेलू तालुक्यातील एकही ग्रामसेवक मुख्यालयी रहात नसल्याचे समोर आल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू कमिटीच्या वतीने मंगळवारी ता. १८ जानेवारी रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. पण सेलू पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये एकही ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावच्या विकासाला खीळ बसली आहे. बरेचसे ग्रामसेवक बाहेरून अपडाऊन करतात. राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जातात. या योजना ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. तसा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक आदेशही काढला आहे. मात्र एकही ग्रामसेवक मुख्यालयी रहात नाही. उलट मुख्यालयही राहात असल्याचे खोटे दाखले सादर करतात. राज्य शासनाच्या निर्णयाची राजरोसपणे पायमल्ली होत आहे हे सुर्याइतके स्पष्ट असताना एकाही ग्रामसेवकावर कारवाई झालेली नाही. यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ विलास मोरे, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, मंजुषा कुलकर्णी, सुनील गायकवाड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.a
Comments are closed.