Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणामुळे लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो आहे, सरकारने दिले अधिकृत स्पष्टीकरण

नवी दिल्ली: कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू आहे. सध्या सर्व प्रौढ व्यक्तींना लसी देण्यात येत आहे. लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीला एक प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, विरोधी पक्ष त्या प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या फोटोला लक्ष्य करत आहेत. आता केंद्र सरकारने फोटोबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रसरकारने पंतप्रधान मोदींची फोटो प्रमाणपत्रावर लावण्याला ‘व्यापक जनहित’ म्हटले असून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत विचारला प्रश्न..

लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोटो आणि संदेश लोकांना कोविड -19 शी संबंधित योग्य पद्धती स्वीकारण्यास आणि लसीबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यास मदत करते. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि माजी पत्रकार कुमार केतकर यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नावर सरकारने हा युक्तिवाद केला. केतकरांनी विचारले होते की कोविड -19 लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांची फोटो लावणे आवश्यक आणि अनिवार्य आहे का? त्यामागे काय कारण होते आणि ते कोणी अनिवार्य केले?

‘व्यापक जनहित’ लक्षात घेऊन मोदींचा फोटो छापला, सरकारचे उत्तर

राज्यमंत्री (आरोग्य) भारती प्रवीण पवार, उत्तर देताना म्हणाल्या की, ही महामारी ज्याप्रमाणे स्वतःला विकसित करत आहे, ते पाहता कोविडशी संबंधित खबरदारी घेणे हा एकमेव मार्ग आहे. जनहित लक्षात घेऊन, पंतप्रधान मोदींच्या फोटोसह असलेले लस प्रमाणपत्र लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यास मदत करते. लोकांपर्यंत असा महत्त्वाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळे मोदींची फोटो लस प्रमाणपत्रावर आहे.

कोविड -19 लसीसाठी प्रमाणपत्राचा मसुदा डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आला आहे, हे सांगण्यावर त्यांनी जोर दिला.

केतकर यांनी सरकारला आणखी एक प्रश्न विचारला होता, “यापूर्वी कोणत्याही सरकारने पोलिओ, स्मॉल पॉक्स इत्यादीच्या कोणत्याही लसीवर असे चित्र अनिवार्यपणे छापले होते का?” मात्र सरकारकडून या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

Comments are closed.