Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाने नव्या जीवनशैलीला स्वीकारण्याचा धडा दिला ! डॉ.जगदीश नाईक

सेलू (डाॅ विलास मोरे) :- कोरोना या जागतिक महामारीचे परिणाम दीर्घकाळ राहतील. कोरोनाने एक प्रकारची भीती, बिनधास्तपणा, तणाव निर्माण केला. परंतु जग थांबले नाही तर एका नव्या जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा धडा करोनाने दिला आहे. असे प्रतिपादन परभणी येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांनी गुरुवारी सेलू येथे केले.

येथील हीरक महोत्सवी गणेशोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ.नाईक यांनी गुंफले. ”कोरोना आणि मानसिक स्वास्थ्य” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील डॉ. झेड.आय.पटेल होते. यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष नारायण सोळंके, चिटणीस गिरीश लोडाया आदींची उपस्थिती होती.

डॉ.नाईक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात आदीमानव काळापासून ते महाभारत आणि संत, मानसोपचारतज्ज्ञ यांच्या विचारांचा संदर्भ देत मनाचे विविध कंगोरे उलगडून सांगितले.
ते म्हणाले, परिस्थितीनुरूप बदल स्वीकारलेच पाहिजेत. आनंदाने समाधानी वृत्ती ठेऊन आणि समरसतेने सद्सदविवेक जागरूक ठेवून करोनाशी लढावे लागणार आहे. परिस्थिती, घटनांचा बिनशर्त स्वीकार, वर्तमानातील आनंदाची अनुभूती, जागरूकता, समरसता, विचार, भावना, वर्तन या मनांच्या पैलूंसोबत शारीरिक संतुलनाचा प्रयत्न आणि विवेकी दृष्टिकोनाने मानसिक स्वास्थ्य अबाधित राखता येते. असे सांगून
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूपेक्षा औदासिन्यातून आत्महत्या केलेल्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. असे डॉ.नाईक यांनी नमूद केले.

आत्महत्या रोखता येऊ शकतात, त्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ.पटेल यांनी कोरोना काळात कौटुंबिक हिंसाचार, आत्महत्यांची घटनांसोबतच मद्यपानसह व्यसनाधीनतेत वाढ झाली होती. त्यामुळे आता नकारात्मक विचार,  राग याला बायपास करून स्वीकार दृष्टिकोन रुजविणे आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन आणि लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन धनंजय भागवत, तर गंगाधर कान्हेकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.निर्मला पद्मावत, चंद्रशेखर मुळावेकर लता गिल्डा, डॉ.कल्पना कुलकर्णी
शोभा कोरडे, संतोष कुलकर्णी, विलास शिंदे, अजित मंडलिक, रेवणअप्पा साळेगावकर, बाबासाहेब हेलसकर, राजेश ढगे, उपेंद्र बेल्लूरकर, श्रीपाद कुलकर्णी, मंजुषा बोराडे, श्याम आढे, रुपा काला, नीता बलदवा, शोभा ढवळे आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.

Comments are closed.