Take a fresh look at your lifestyle.

महात्मा गांधींना अभिप्रेत समृद्ध भारत घडावा – डॉ.बालाजी चिरडे

सेलू (डाॅ विलास मोरे) :-  भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना स्वातंत्र्य संग्रामातील म‌.गांधींचे योगदान, त्यांचे विचार याचे मंथन होणे वर्तमान परिस्थितीत आवश्यक आहे. गांधीजींनी त्याग आणि अहिंसेचा दिलेला मूलमंत्र फक्त स्वातंत्र्यप्राप्ती पुरताच मर्यादित नव्हता तर त्यातून समृद्ध भारत घडला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते असे प्रतिपादन डॉ. बालाजी चिरडे यांनी केले. ते नूतन महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंतीदिनाचे औचित्य साधून नूतन महाविद्यालय, सेलू आणि कै.नितीन महाविद्यालय, पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधी यांचे योगदान’ या विषयावर पीपल्स कॉलेज नांदेड येथील इतिहास अभ्यासक डॉ.बालाजी चिरडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी हे होते तर ऑनलाइन माध्यमातून

कै. नितीन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम फुन्ने, व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ. उत्‍तम राठोड, डॉ.जगन्नाथ बोचरे, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संयोजन समितीचे समन्वयक डॉ.राजाराम झोडगे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.अर्चना पत्की, प्रा. कीर्ती डोईफोडे, प्रा. दयानंद जामगे यांची उपस्थिती होती.

आपल्या व्याख्यानात चिरडे यांनी गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचे, कर्तृत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवत त्यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला जे स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचे महत्त्व आणि आज आपली जबाबदारी याबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. गांधीजींना अभिप्रेत समृद्ध व नीतिमूल्येयुक्त भारत देश घडवण्याची आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

अतिथींचा परिचय व कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. राजाराम झोडगे यांनी केले. प्राचार्य डॉ. राम फुन्ने यांनी आपल्या मनोगतात सद्यपरिस्थितीत अशा कार्यक्रमांची आवश्यकता विशद केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शरद कुलकर्णी यांनी म.गांधींनी भारतीय राजकारणाला नैतिकतेशी जोडले. आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे गांधींचा विचार आजच्या युगात अधिक प्रखरतेने नवीन पिढीसमोर जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती डोईफोडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जगन्नाथ बोचरे यांनी केले.

Comments are closed.