सेलू (डाॅ विलास मोरे) : दिवाळीचा सण चार दिवसावर येवून ठेपला आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड सुरू असली तरी खरेदीसाठी शेतकरी मात्र नगण्यच दिसत आहेत. मागील वर्षी पेक्षा सर्वच दिवाळी साहित्य २० ते ३० टक्क्याने महागले असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी सेलू येथील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. यात सर्वाधिक शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंब तसेच व्यापारी वर्गातील महिला खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मात्र ग्रामीण भागातील ग्रामस्थ व शेतकरी नगण्यच दिसत आहेत. काही शेतकरी व्यापारांना सोयाबीन विकून दिवाळीसाठी साहित्य खरेदी करीत आहेत. दिवाळी हा सण प्रत्येकाचा आनंदाचा सण आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे ग्राहक खरेदी करीत आहेत. त्यात कापड, सोने चांदीचे दागिणे, फटाके, इलेक्ट्रीक वस्तू यांची दुकाने सजली असून घर सजावटीच्या साहित्याच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून ग्राहकांकडून खरेदी मंदावली होती. परंतु आता कोरोनावरील निर्बंध उठताच शिवाय कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यामुळे ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
विशेषतः दिवाळीसारख्या सण उत्सवाच्या काळात वापरण्यात येणाऱ्या सजावटीचे सामान, आकाश दिवे, लाईटींग या साहित्याच्या दुकानातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. महिला वर्गासोबत पुरुषही कापडांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल अवस्थेत आहे. अद्याप शासनाकडून कवडीचीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचा वाली म्हणवून घेणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन दिवाळी साजरी करण्या करता मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत…
Comments are closed.