Take a fresh look at your lifestyle.

देऊळगाव गात मंडळात अतिवृष्टीमुळे पिके गेली पाण्याखाली ! पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

सेलू (डाॅ विलास मोरे) : सेलू तालुक्यातील देवळगाव गात महसुल मंडळामध्ये दि. २७ व २८ सप्टेंबर २०२१ रोजी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांमध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी गुगळी धामनगावच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार श्री झांपले यांच्याकडे गुरूवारी ता. ३० सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे.

यंदा जुन महिण्यातील मृग नक्षत्रापासून ते जुलै, ऑगस्ट मध्येही देऊळगाव गात मंडळात जास्तीचा पाऊस होता. सप्टेंबर महिण्यापासून मात्र पावसाने कहरच केला दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी तर अतिमुसळधार अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्याने देवळगाव गात, गुगळी धामनगाव, तिडी पिंपळगाव, हिस्सी या गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन, कापुस, तुर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर काही ठिकाणी पुरामुळे पिके जमिनीसह खरडून वाहून गेले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी मोठी अर्थीक गुंतवणुक करून पिकांची पेरणी व लागवड करून मशागत केली होती. मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने यंदा पिके देखील चांगली बहरली होती. मात्र सप्टेंबर महिण्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने पिकांचे कधीही न भरून निघणारे प्रचंड नुकसान झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी गुगळी धामणगावच्या ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर सरपंच शारदा महाजन, तुकाराम महाजन, दत्तात्रय डख, उपसरपंच बाबासाहेब कदम, माजी सरपंच विठ्ठल डरव, रामभाऊ गायकवाड, मुंजाभाऊ डख, रत्नेश्वर डख, डिगांबर माथने, उदय डख, विलास डख, वचिष्ट डख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments are closed.