Take a fresh look at your lifestyle.

सेलूत जिल्हा मध्यवर्ती बँकेला संतप्त शिवसैनिकांनी ठोकले कुलुप..

खरीप व रब्बी हंगामात पिक कर्ज वाटप करतांना, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेलू (जि.परभणी) शाखेतील कर्ज पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करीत, तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची मोठी हेळसांड केली जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमवारी (२८फेब्रुवारी) शाखेच्या पाथरी रोडवरील मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, तालुका प्रमुख रमेश डख, पवन घुमरे, युवासेना तालुका प्रमुख अतुल डख आदींसह बाजार समिती प्रशासक मंडळातील सदस्यांच्या नेतृत्वात, सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.

दुपारी साडे बाराच्या सुमारास मंडळ अधिकारी एन.आर.सोनवणे, मुकुंद आष्टीकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन, आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या व निवेदन स्वीकारले. काही पुढार्‍यांच्या सांगण्यावरून, तालुक्यातील मोजक्याच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जिल्हा बँकेकडून पिक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. खरीप हंगामासाठी तर एकाही शेतकर्‍याला पिक कर्ज वाटप केलेले नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक रब्बी व खरीप पिक कर्ज वाटपासाठी बँकचे कर्ज विभागातील अधिकारी टाळाटाळ करीत आहे. शेतीची कामे सोडून कर्जासाठी शेतकऱ्यांना चकरा मारायला लावून हेळसांड करीत,अपमानास्पद वागणूक देत आहेत. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे.

पिक कर्ज वाटपाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, रमेश डख,शहर प्रमुख मनीष कदम, पवन घुमरे, अतुल डख, संचालक विठ्ठल कारके, अरूण ताठे, सुधाकर पवार, जिवन चव्हाण, अभय लहाने, अंकुश लोंढे, गोविंद सोळंके, कृष्णा तिडके, गोपाल कदम, शक्ती बोराडे, बाबासाहेब भाबट, सुभाष गायकवाड, संजय गायके, अनिल रोडगे, पांडुरंग कावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

 डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.