Take a fresh look at your lifestyle.

शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी पदवीधरांनी विशेष लक्ष द्यावे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादा भुसे यांचे प्रतिपादन

दरवर्षी महाराष्ट्राच्या चारही कृषी विद्यापीठांतून 14 हजार विद्यार्थी पदव्या घेवून बाहेर पडतात. परंतू यातील केवळ 10 ते 15 टक्केच विद्यार्थी कृषीशी संबंधित क्षेत्रात येतात. खरेतर कृषी क्षेत्रात सेवेच्या अनेक संधी उपलब्ध असून पदवीधरांनी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी विशेष संशोधन करावे. कृषी विभागाकडून यापुढे युवा संशोधकांनाही गौंरविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेविसावा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि.25 ) संपन्न झाला. अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष तथा कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.चारुदत्त मायी हे उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ.अशोक ढवण, आमदार डॉ.राहुल पाटील, दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत, डॉ.एस.टी.बोरीकर, माजी कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ.धीरजकुमार कदम, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, उपकुलसचिव डॉ.गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दीक्षांत भाषणात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी म्हणाले की, केवळ तंत्रज्ञानच शेतकर्‍यांना शाश्वत आर्थिक संपन्नता प्रदान करू शकतील. देशातील कृषी क्रांती ही संशोधनाच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान आधारित झाली असून कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. एकीकडे, हरितक्रांतीचे फायदे कमी होतांना शाश्वत शेतीकरिता आपल्यासमोर असंख्य आव्हाने आहेत. हवामान बदल या पर्यावरणीय समस्यांनी जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे

. कोरडवाहू क्षेत्रात अजूनही हरितक्रांतीची गरज आहे. अन्न सुरक्षसोबतच पोषण सुरक्षा यावर भर दयावा लागेल. गेल्या 50 वर्षांमध्ये संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने मोठे योगदान दिले. विद्यापीठ संशोधनाने आधीच देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. आज देशाला खाद्यतेलाची तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असुन मराठवाडा विभागातील माती आणि हवामान पारंपारिक तेलवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे, त्यामुळे विद्यापीठाने तेलवर्गीय पिकांच्या नवीन संशोधित जातीं विकसित करण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले.
स्वागतपर भाषण कुलगुरू डॉ.ढवण यांनी केले.

कृषीमंत्री भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी अनुग्रहीत करण्यात आले. समारंभात श्री भुसे यांच्या हस्ते कृषि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ डि के पाटील व डॉ गिते (2017-18), डॉ एम के घोडके (2018-19), डॉ के टी आपेट व डॉ सी व्ही अंबडकर (2019-20) यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पोरितोषिकाने गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभात 2017-18, 2018-19 व 2019-20 वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण 10,997 स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीने माननीय प्रतिकुलपती व्दारा अनुग्रहीत करण्यात आले. विविध विद्याशाखेतील 9922 स्नातकांना पदवी, 978 स्नातकांना पदव्युत्तर तर 97 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्यात आले. समारंभात विविध अभ्यासक्रमातील विद्यापीठाने व दात्यांनी ठेवलेली सुवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून गौरविण्यात आले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ विणा भालेराव यांनी केले.

Comments are closed.