Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे… WhatsApp वर केलेल्या एका छोट्या चुकीमुळे, महिलेने गमावले 3 लाख रुपये; तुम्ही ही चूक करू नका

सायबर गुन्हा: देशात स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातच स्वस्त इंटरनेट मिळत असल्यामुळे जवळपास प्रत्येक स्मार्टफोन वापरणार्‍या व्यक्तीकडे इंटरनेट पॅक असतो. त्यातच WhatsApp हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप न वापरणारा व्यक्ती क्वचितच तुम्हाला दिसेल.

जसजसे तंत्रज्ञान सर्वांकडे पोहोचत आहे, तसतसे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आपण नेहमीच ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या बातम्या वाचत असतो. सायबर गुन्हेगार नेहमीच लोकांना आर्थिकरित्या फसवण्यासाठी ऑनलाइन जाळे टाकतच असतात. बर्‍याच वेळी ते लाखो रुपयांची वस्तु किंवा कॅश देण्याच्या बहाण्याने लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्यांना लुटतात. यासाठी ते प्रामुख्याने WhatsApp सारख्या अॅपचा वापर करतात. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. एका 27 वर्षीय महिलेला तिच्या एका चुकीमुळे लाखो रूपयांचा चुना लागला.

महिलेची झाली 3 लाखांची फसवणूक

प्राप्त महितीनुसार, एका 27 वर्षीय महिलेची सायबर गुन्हेगाराने 3 लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने एका आघाडीच्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर महिलेला बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी सांगितले की, ती महिला कांदिवलीत राहते आणि व्यवसायाने एक इंटिरियर डिझायनर आहे. तिने चारकोप पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने सांगितले की, त्यांना व्हॉट्सअॅपवर एक लिंक सापडली जिथे एका अग्रगण्य ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या  नावाने काही टास्क पूर्ण करून बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते.

दिले होते मोठे बक्षीस देण्याचे प्रलोभन

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, त्या महिलेने लिंकवर क्लिक केल्यानंतर, एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यास सांगितले गेले, त्यानंतर महिलेला 64 रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्यानंतर महिलेला रिचार्ज करण्याचे आणखी एक कार्य करण्यास सांगितले गेले, यावेळी सुद्धा महिलेला बक्षीस मिळाले.

त्यानंतर अधिक बक्षिसे मिळवण्यासाठी अतिरिक्त पैसे जमा करण्यास त्या महिलेला प्रोत्साहित करण्यात आले. मोठे बक्षीस मिळवण्याच्या नादात महिलेने दुसरे कार्य पूर्ण करण्यासाठी तब्बल 3.11 लाख रुपये जमा केले पण त्या बदल्यात त्यांना काहीच मिळाले नाही.

आपली फसवणूक झालेली लक्सशात येताच महिलेने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भादंवि कलम 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे, पुढील तपास सुरू आहे.

तुम्ही करू नका ही चूक

तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरील अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका ज्या विनामूल्य बक्षीस किंवा मोफत पैसे देण्याचे आश्वासन देतात. अशा लिंक्समुळे आर्थिक नुकसान होण्याची फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे अशा लिंक्स वर क्लिक न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

Comments are closed.