सांगली: कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एप्रिल पासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे छोटे व्यापारी आणि दुकानदार हवालदिल झाले आहेत. सगळे व्यापारी सध्या तोट्यात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान, दुकानदारांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. सांगली दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वसामान्यासह दुकानदारांना दिलासा देणारे पाऊल उचलत आहेत. त्यांनी एक महत्वाची घोषणा केली असून, ज्या झोनमध्ये कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी आहे त्या भागात दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसा अध्यादेश आज काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते सांगली दौर्यावर होते. पाहणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुकानांच्या वेळेविषयी घोषणा केली. ज्या भागात रुग्ण कमी आहेत त्या भागातील दुकाने जास्त वेळ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी संघाकडून वारंवार केली जात होटी. काही व्यापारी संघांनी बंडखोरीचा पवित्र घेत सरकारला याबाबत निर्णय घेण्याची मुदत दिली होती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आजच्या घोषणेनंतर सर्वजण अधिकृत अध्यादेशाची वाट पाहत आहेत.
दुकानदारांना दिलासा देण्याबाबतची माहिती सांगत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थितीबाबतही माहिती दिली. राज्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पूरस्थितीत आतापर्यंत लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. अतिशय कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने राज्यात अशा प्रकारची पूरस्थिती निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Comments are closed.