Take a fresh look at your lifestyle.

झिका विषाणूच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने पाठवले पथक, महाराष्ट्रातील स्थितीचा घेणार आढावा

मुंबई: महाराष्ट्रात झिका विषाणूमुळे होणार्‍या आजाराचे पहिले प्रकरण आढळल्यानंतर लगेच केंद्राने सोमवारी राज्यात एक उच्चस्तरीय पथक पाठवले. या आजाराला पसरण्यापासून रोखण्याकरिता उपाययोजना आखण्यास राज्यातील संबंधित अधिकार्‍यांची मदत करता यावी म्हणून हे पथक राज्यात पाठवण्यात आले.

या तीन सदस्यीय केंद्रीय पथकात पुण्याच्या प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (एनआयएमआर), आयसीएमआर, नवी दिल्लीचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, हे पथक राज्याच्या आरोग्य विभागासोबत मिळून काम करेल, परिस्थितीचा आढावा घेईल आणि झिका व्यवस्थापनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कृती आराखडा अंमलात आणला जात आहे की नाही याचे आकलन करेल. तसेच राज्यातील झिका विषाणूच्या प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची शिफारस करेल, असे निवेदनात म्हटले आहे.

पुण्यात आढळला पहिला रुग्ण

राज्यात झिका विषाणू संसर्गाचे पहिले प्रकरण 31 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात आढळून आले. तथापि, राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संसर्ग झालेली महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाली आहे. महिला आणि महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे राज्य आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

झिका विषाणूची लक्षणे काय आहेत?

डेंग्यू आणि मलेरिया प्रमाणे, झिका हा एक प्रकारचा विषाणू आहे जो डासांव्दारे पसरतो. हा आजार प्रामुख्याने एडीस डासांद्वारे पसरलेल्या विषाणूमुळे होतो, जे दिवसा चावतात. डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवण्यासाठीही हाच डास कारणीभूत आहे.

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप, जे डेंग्यूसारखेच आहे. मात्र प्राथमिक तपासणीत या आजाराला ओळखणे फार कठीण आहे. अनेक रुग्ण फ्लूच्या लक्षणांमुळे गोंधळून जातात आणि त्यामुळे त्यांना झिका आहे की नाही हे माहित नसते. झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, पुरळ आणि सांधेदुखी यांचा समावेश होतो. रुग्णांना या विषाणूची लागण होण्यास किंवा लक्षणे दिसण्यास 3 ते 14 दिवस लागतात.

Comments are closed.