Take a fresh look at your lifestyle.

श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या मंदिर भाविकांसाठी सुरू असणार की बंदच राहणार?

नाशिक: राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने ओसरत असून, दुसर्‍या लाटेचा प्रभाव बर्‍याच अंशी कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू होतील अशी भाविकांची आशा आहे. मात्र, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका कायम असल्यामुळे सरकार सण-उत्सव साजरे करण्याबाबत सावधगिरी बाळगत आहे.

तिसर्‍या लाटेच्या भीतीपोटी भाविकांसाठी मंदिर बंद असणार

दरम्यान, उद्यापासून श्रावण मास सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबक राजांचे मंदिर सुरू असेल की नाही, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम होता. आत या संभ्रमावरून पडदा उठला आहे. प्रशासनाने त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून,  दर सोमवारी होणारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणादेखील भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

भाविकांची गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

त्र्यंबकेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी आद्य मानले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होईल. भाविकांची गर्दी वाढली तर पुन्हा कोरोना प्रसाराच धोका वाढेल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार आहे.

मोजक्या पुजार्‍यांच्या हस्ते होणार त्रिकाल पूजा

मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी परंपरेप्रमाणे त्रिकाल पुजा होणार आहे. यात कोणताही खंड पडू देण्यात येणार नाही.  मोजक्या पुजार्‍यांच्या हस्ते ही त्रिकाल पुजा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.उद्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सायंकाळी भगवान त्र्यंबक राजांच्या पादुकांना स्नान घालून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत छोटा पालखी सोहळा होईल, अशी मंदिर प्रशासनाने, माहिती दिली आहे.

Comments are closed.