Take a fresh look at your lifestyle.

शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी भारतीय ग्राहक पंचायतमध्ये सहभागी व्हा ! सेलू येथे सदस्य नोंदणी अभियानात डाॅ विलास मोरे यांचे आवाहन

सेलू :- शोषणाविरुद्धचा कृतिशील लढा उभारून सामाजिक परिवर्तनाची आस बाळगणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डाॅ विलास मोरे यांनी सेलू येथे रविवारी ता. 26 सप्टेंबर रोजी केले. यावेळी सदस्य नोंदणी अभियाना दरम्यान 51 नागरीकांनी ऑनलाईन सदस्य नोंदणी केली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत केंद्रीय कमिटीच्या वतीने संपूर्ण देशात 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार सेलू येथे रविवारी ता. 26 सप्टेंबर रोजी सदस्य नोंदणी अभियान राबविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात 51 सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालुका सचिव मंजुषा कुलकर्णी, गंगाधर कान्हेकर, अशोक कोपुलवार, विठ्ठल गजमल, सिद्धार्थ गायकवाड, श्रीपाद रोडगे, गणेश थोरात, राजू चव्हाण, आकाश जाधव, अश्विनी घोगरे, प्रकाश डहाळे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना डाॅ मोरे म्हणाले की, ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ ही ग्राहकांनी ग्राहकांसाठी स्थापन केलेली आशिया खंडातील सर्वात मोठी अशी स्वयंसेवी ग्राहक चळवळ असून ‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ हे या चळवळीचे ब्रीदवाक्य आहे. ग्राहक शक्ती एकजूट झाली तर ग्राहक शोषणमुक्त होऊ शकतो यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानात सहभाग नोंदवून ग्राहक चळवळ अधिक बळकट करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार मंजुषा कुलकर्णी यांनी केले.

Comments are closed.