Take a fresh look at your lifestyle.

सेलू शहरातील रस्त्यावरअतिक्रमणे वाढली…

सेलू : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये अनधिकृत हातगाडी, फेरीवाले, स्टॉलधारक यांच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या बेकायदा अतिक्रमणांवर प्रशासन कधी कारवाई करणार अशी विचारणा केली जात आहे. शहरातील रस्त्यांवर बेकायदा पथारी व्यावसायिकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाला वेळोवेळी विचारणा केली असता शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने दूर केली जातील असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात येते. मात्र याचा विसर प्रशासनाला पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. शहराच्या मध्य वस्तीतील क्रांतीचौक, बाबासाहेब मंदिर रोड, स्टेशन रोड, नुतन रोड, जिंतूर रोड, रायगड काॅर्नर, रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड समोरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिक, स्टॉलधारक आणि हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत.

फळ विक्रेते व हातगाडेवाल्यांनी तर बसस्टॅन्ड समोरील रस्त्यावर अक्षरशः भर रस्त्यावर अतिक्रमणे करून उच्छाद मांडला आहे. यामुळे रस्त्यांवरून नागरीकांना चालणेही अवघड झाले आहे. याठिकाणी तैनात असलेला पोलीस कर्मचारी कुठे असतो नेमके काय काम करतो ? हा सेलूकरांना पडला आहे. पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते पुन्हा एकदा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. याचा त्रास सर्वसामान्य सेलूकरांना सहन करावा लागत असल्याची तक्रार केली जात आहे. दरम्यान शहरातील रस्त्यावर झालेली अनाधिकृत अतिक्रमणे काढावी अशी सेलूकरांची मागणी आहे…

चौकटीचा मजकूर…. @ राजकीय वरदहस्त…
शहरातील विविध रस्त्यावरील बहुतांश अनाधिकृत अतिक्रमणांवर राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने ही अतिक्रमणे वारंवार उभी राहत आहेत. परिणामी स्वच्छ सेलू आणि सुंदर असणाऱ्या सेलूची बकाल अवस्था पहायला मिळत आहे….

– डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.