Take a fresh look at your lifestyle.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक गंभीर ! सेलू-पाथरी रोडवरील घटना

सेलू (डाॅ विलास मोरे) :- सेलू-पाथरी रोडवरील मनजीत जिनिंगजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार ता. ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून आसाराम प्रल्हाद मोगल वय ४७ असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनेची माहिती अशी की, आसाराम प्रल्हाद मोगल (वय ४७) व शरद तांगडे (वय ४२) दोघेही रा कुंडी ता. सेलू जिल्हा परभणी येथील रहिवासी असून सेलू येथील सपना क्लाॅथ स्टोअर्स या कापड दुकानात सेल्समन म्हणून कामावर होते. मंगळवारी दिवसभर दुकानात काम करून रात्री ८.३० वाजता MH 22 Y 4765 या क्रमांकाच्या दुचाकीने सेलूहून कुंडीकडे जात होते.

पाथरी रोडवरील मनजीत जिनिंगजवळ एका अज्ञात वाहनाने धडक मारल्याने ते जागीच कोसळले. घटनेतील अज्ञात वाहन फरार आहे. दरम्यान शाम मुंडे हे या मार्गाने जात असल्याने त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी या प्रकरणाची माहीती नगरसेवक मनिष कदम यांना मोबाईलवरून सांगितली. मनिष कदम यांनी तातडीने अॅम्बुलन्स घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

दोन्ही जखमींना उपचारासाठी चिरायु हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. आसाराम मोगल यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील पार्वती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान रात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. तर शरद तांगडे यांचीही प्रकृती गंभीर असून यांच्यावर सेलू येथील रूग्णालयात उपचार चालू आहेत. सेलू पोलीस ठाण्यात अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही….

Comments are closed.