Take a fresh look at your lifestyle.

सत्तार यांची गाडी अडवून शिवसैनिकांनी व्यक्त केला रोष !

नगर : शिवसेनेचे मंत्री असलेले राज्याचे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्याच पक्षाच्या शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आज येथे आली. येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो किंवा नामोल्लेख नाही, तसेच शिवसेनेच्या नेत्यांना व स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे, अशी नाराजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळाइमारत व व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी सत्तार आज येथे आले होते. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार व विरोधी पक्षातील भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, कार्यक्रमाला येत असतानाच कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी येथील आनंदऋषीजी चौकात अडविली व तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

सत्तार यांनी शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या. यापुढे अशी चूक होणार नाही. नगर जिल्ह्यात येताना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सन्मान देण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना मी शासकीय अधिकाऱ्यांना देईन, असे म्हटल्यानंतर या वादावर पडदा पडला.

पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. जय भवानी, जय शिवाजी, उद्धव ठाकरे झिंदाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मंत्री सत्तार पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे असूनही जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात त्यांचा फोटो लावण्याचा किंवा नामोल्लेख करण्याचा शिष्टाचार आयोजकांनी पाळला नाही. तुम्ही शिवसेनेचे मंत्री येथे येणार असताना जिल्ह्यातील व स्थानिक पदाधिकाऱ्यांना निमंत्रणसुद्धा दिले नाही किंवा पत्रिकेत त्यांची साधी नावेही टाकली नाहीत.

उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे म्हणाले, की कार्यक्रमासाठी स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. आजचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचा असला, तरी आमच्या दृष्टीने तो विरोधकांचाच आहे. या वेळी तालुकाप्रमुख संजय शिंदे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ गोरे, शहरप्रमुख विजय गोहर, आशिष गाडेकर, युवराज बांगरे, धनंजय घोरपडे, गंगा बेंद्रे, ज्ञानेश्वर खोबरे, सुयोग सावकारे, संतोष जोर्वेकर व विजय मोरे उपस्थित होते.

मंत्रिमहोदयांच्या आगमनादरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस व सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धांदल उडाली होती.

Comments are closed.