Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी: पाकिस्तानात इम्रान खान सरकार कोसळलं; ‘हे’ असतील नवीन पंतप्रधान

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे इम्रान खान सरकार अखेर पडले आहे. पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

पाकिस्तानच्या संसदेतील तब्बल 174 सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात मतदान केल्यामुळे अखेर इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

याआधी गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष कासिम सूरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. मात्र, हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कासिम सूरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवत अविश्वास ठरावाची वाट मोकळी करून दिली.

दरम्यान पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 342 सदस्य आहेत, ज्यामध्ये 172 बहुमत आहे. पीटीआयच्या नेतृत्वाखालील युती 179 सदस्यांच्या पाठिंब्याने तयार झाली होती, ज्यामध्ये इम्रान खान यांच्या पीटीआयचे 155 सदस्य होते. पीटीआयने आपला प्रमुख सहयोगी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) गमावल्यानंतर आणि विरोधी पक्षाने 8 मार्च रोजी पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर इम्रान खानला मोठा धक्का बसला.

कोण असणार नवीन पंतप्रधान ?

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे खासदार आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. शाहबाज शरीफ 13 ऑगस्ट 2018 पासून नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत आणि विरोधी पक्षनेतेही आहेत. यापूर्वी शाहबाज शरीफ हे तीन वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते पंजाबचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्या शरीफ पीएमएल-एनचे अध्यक्ष आहेत.

Comments are closed.